चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जग थांबले. सर्व उद्योग, वाहतूक बंद पडली. यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे वांदे झाले आहेत. जिल्ह्यात ऑटो, काळीपिवळी चालवून पोट भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचा व्यवसाय आता बंद आहे. त्यामुळे त्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व वाहतूक, दुकाने बंद पडले आहे. याचा फटका जिल्ह्यातील सर्व ऑटो चालक व काळीपीवळी चालक धारकांना बसलेला आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत दिल्ली सरकारने एकस्तुत्य असा शासनिर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व नोंदणीकृत ऑटोचालक व काळीपिवळी चालक परवाना धारकांच्या कुटुंबीयांना ५ हजार आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्याच धर्तीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत ऑटोचालक, काळीपीवळी चालकधारकांना ५ हजार आर्थिक मदत व धान्याची किट देण्यात यावी. जेणेकरून या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाह करणे सोईचे होईल, असेही खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे.