चंद्रपूर /प्रतिनिधी:
शहरातील तीनही झोन अंतर्गत येणाऱ्या ६ मोठे नालेसफाई स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून, १० छोट्या नाल्यांच्याही स्वच्छतेला चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरुवात करण्यात आली आहे. महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांच्या पुढाकारातून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून जुन महिन्यापर्यंत शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रपूर शहरातील तीनही झोनअंतर्गत बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाला आहे. यामुळे नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा निर्णय मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी घेतला आणि त्यानुसार निर्देश देत स्वच्छतेच्या कामाला सुरुवातही झाली आहे.
शहरातील महाविदर्भ ते मच्छीनाला, सावरकर नगर, बगड़खिडकी रेल्वेपटरी, बिनबा मोरी ते सटवाई, रहमत नगर , सिस्टर कॉलोनी, चांबारकुंडी, आकाशवाणी, निंबाळकर वाडी, एस.पी कॉलेज ते नगराळे दवाखाना इत्यादी मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरु असून मनुष्यबळ व जेसीबी च्या मदतीने तेथील गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील माती दगड बाहेर काढून सांडपाण्यालावाट काढून दिली जात आहे. त्यामुळे सांडपाणी तुंबून न राहता पुढे वाहून जाईल, सांडपाण्याला वेग आल्याने नाल्याजवळील दुर्गंधी कमी व्हायला मदत होईलसध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन सुरू असून नागरिक घरातच आहेत. लॉकडाऊननंतर जेव्हा नागरिक घराबाहेर पडतील तेव्हा नाले स्वच्छतेचे सुंदर चित्र त्यांना बघायला मिळेल, असा आशावाद आयुक्त राजेश मोहिते यांनी व्यक्त केला.
नाले सफाईचे कार्य मशीनद्वारे आणि जेथे मशीनद्वारे शक्य नाही तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे होत आहे. सध्या स्वच्छतेच्या कामात नियमीत ३१५ सफाई कर्मचारी व अतिरिक्त ११५ असे एकुण ४३० कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय मोठ्या नाल्यांच्या सफाईकरीता ५ जेसीबी लावण्यात आल्या असून लवकरच पोकलेनद्वारे स्वच्छता सुरू करण्यात येणार आहे. अन्य नाले जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरीत नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येत आहे.
यापूर्वी मे महिन्यात सुरू होणारी नाला सफाई यावर्षी एप्रिल महिन्यातच सुरू करण्यात आली असून ३१ मे रोजी शहरातील संपूर्ण नाले स्वच्छ करण्याचा मानस मनपा आयुक्त राजेश मोहिते यांचा आहे. विविध विभागांच्या समन्वयातून स्वच्छता विभाग हे उद्दिष्ट साध्य करीत आहे. नाले स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी झोनचे सहायक आयुक्त यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात, मुख्य स्वच्छता अधिकारी, झोनचे स्वच्छता निरिक्षक, आपत्ती व्यवस्थापन पथक सांभाळत आहे. नाला स्वच्छतेदरम्यान निघणारा गाळ हा परिसरातील सखल भागात टाकण्यात येणार आहे.