नागपूर/प्रतिनिधी:
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हयात कायदा व सुव्यवस्था उत्तम ठेवण्यात नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. पोलीस विभागाने अश्या या कठीण परिस्थितीत भरपूर मेहनत घेतली त्याबद्दल पालकमंत्र्यानी संपूर्ण पोलीस विभागाचे अभिनंदन केले आहे.
खरे तर,कोविड-१९ चे आव्हान फार मोठे आहे. रोज विविध सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अधिक चोख करण्याची गरज असल्याचे निर्देश नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला दिले आहेत.
सध्या मोठया संख्येने नागरिक विशेषत: तरूण मंडळीचे रस्त्यावर विनाकारण फिरणे, नागरिकांना प्रवासी पासेस देतांना अर्जात नमूद कारणांची चौकशी व पडताळणी करूनच परवानगी देणे,
ग्रामीण व शहरी भागात पोलीस बंदोबस्त वाढवून अत्यावश्यक सेवेसाठी येणा-या नागरिकांमध्ये सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगणे ,शहर व ग्रामीण भागातील अंतर्गत भागात गस्त वाढविणे, नागरिकांना मास्क बंधनकारक करणे इत्यादी बाबत लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस यंत्रणेला दिले.
अन्नधान्य वितरणाच्या ठिकाणी गर्दी कमी करणे, स्वस्त धान्य दुकानदारांच्या विरोधात तक्रारी समोर येत आहेत, नियम डावलून राशन दुकानदार व्यवहार करत असल्यास कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा आढावा बैठकीत पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
ज्येष्ठ नागरिक घरीच असल्याने त्यांचे नियमित व्यायाम, बाहेर फिरणे बंद झाले आहे त्यांच्याकरिता स्थानिक चॅनेलवर सकाळी 7 ते 8 आणि 8 ते 9 या वेळेत वैद्यकीय तज्ज्ञाकडून मार्गदर्शन तर योग शिक्षकाकडून प्राणायाम,योगा प्रोग्राम मधून मार्गदर्शनपर कार्यक्रम प्रसारित करावा व त्याची प्रसिद्धी करावी जेणेकरून घर बसल्या नागरिक याचा लाभ घेतील आणि पर्यायाने व्यायाम केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदतच होईल.