Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल १३, २०२०

चंद्रपूरात अडीच कोटी खर्चून तत्काळ तयार होणार कोरोना विषाणू संसर्ग स्वॅब तपासणीची प्रयोगशाळा:विजय वडेट्टीवार

चंद्रपूरमध्ये अडीच कोटी रुपयांची
कोरोना प्रयोगशाळा उघडणार : ना.विजय वडेट्टीवार
Ø जिल्हा कायम कोरोना मुक्त राहील यासाठी सर्वांनी साथ देण्याचे आवाहन
Ø जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह नाही
Ø 20 व्हेंटिलेटरची पुढील 10 दिवसात खरेदी 
Ø अडीच लाख लोकांना किराणा साहित्य उपलब्ध करणार
Ø केसरी शिधापत्रिका असणाऱ्यांनाही लाभ मिळणार
Ø जिल्हा बाहेर अडकलेल्यांना आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
Ø महसूल वाढविण्यासाठी ऑनलाईन स्टँप ड्युटी सुरू करण्याची सूचना
Ø चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता गोळा करण्याची परवानगी मागणार
Ø महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करण्याचे आवाहन
Ø मदतीचे वाटप करताना दुजाभावाचे राजकारण चालणार नाही
Ø जिल्ह्याच्या सर्व सीमा आणखी कणखरपणे बंद करा
Ø कोरोना पॉझिटिव शेजारी जिल्ह्यातून आता अपडाऊन बंद

चंद्रपूर  : कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या बाबतची तपासणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्वॅब तपासणीची प्रयोगशाळा चंद्रपूर येथे सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे ही घोषणा केली. उद्यापासूनच जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात या कामाला सुरुवात होणार आहे.
Maharashtra: Congress leader makes a U-turn, backs prohibition in ...
कोरोना विषाणू संसर्ग तपासण्यासाठी घशातील थुंकीची चाचणी केल्या जाते. विदर्भात सध्या नागपूर येथे ही तपासणी होत आहे. नुकतीच राज्यशासनाने अकोला येथे अतिरिक्त प्रयोगशाळा उघडण्याची घोषणा केली होती. तथापि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज विभागाच्या सामाजिक दायित्व निधीतून 2 कोटी 18 लक्ष खर्चाची तरतूद करत या कामाला उद्यापासून सुरुवात करण्याचे निर्देश पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिले. यासोबतच जिल्ह्यात आवश्यक असणाऱ्या 20 वेंटीलेटरची खरेदी सामाजिक दायित्व निधीतून करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग संदर्भात सुरू असलेल्या प्रशासनाच्या कामाचा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार,जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,आयुक्त राजेश मोहिते यांच्याकडून आढावा घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना व्हिडिओ संदेश देताना त्यांनी ही घोषणा केली. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एस. मोरे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात 2 व 3 रुपये दराने अन्नधान्य व मोफत तांदूळ वाटप सुरु आहे. तरीही अनेक कुटुंबाला तेल, तिखट, डाळ, साखर अशा जीवनावश्यक किराणा वस्तूंची गरज आहे. सामाजिक दायित्व निधीतून जिल्ह्यातील गरिबी रेषेखालील 1 लक्ष 30 हजार व अंत्योदय योजनेतील एक लक्ष लाभार्थ्यांना 20 एप्रिलपासून रेशन दुकानातून वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात कोणाचीही उपासमार होऊ नये,शिव भोजन योजना, मोफत अन्नदान योजना राबवितांना माणुसकीच्या नात्याने समान वितरण व्हावे, यामध्ये कोणताही दुजाभाव होऊ नये याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले.

गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो मजूर अन्य राज्यात कामाला आहे. लॉक डाऊनमुळे ते अडकले असून त्यामुळे घरातील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची आबाळ होत आहे. आपल्या परीवारा पासुन दुर असणाऱ्या या नागरिकांना घरापर्यंत पोहोचविणे गरजेचे असून या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लवकरच हा गुंता सोडवण्यात जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचा महसूल वाढवण्यासाठी आणि गडचिरोली चंद्रपूर व लगतच्या जिल्ह्यातील तेंदूपत्ता उत्पादक व मजूर यांना रोजीरोटी मिळावी यासाठी तेंदुपत्ता संकलनाला शासनाने परवानगी द्यावी. तसेच ऑनलाइन स्टॅम्प ड्युटी विक्रीला सुरुवात करावी ,अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रपूर जिल्हा सध्या कोरोना मुक्त आहे. जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. पॉझिटीव्ह रुग्ण असणारे नागपूर,यवतमाळ जिल्हे शेजारी आहेत. अन्य राज्यांच्या सीमा देखील चंद्रपूरला लागून आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याच्या सीमा ओलांडून सुरू असलेल्या अपडाऊनला बंद करा. जिल्हा पोलिस अधीक्षकांना संपूर्ण सीमारेषेवर आणखी बंदोबस्त वाढविण्याची सूचना देण्यात आली आहे. सीमावर्ती भागातील गावातील नागरिकांनी देखील आपल्या गावात येणाऱ्या नवीन व आगंतुक लोकांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


उद्या 14 एप्रिलला घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागरिकांनी आपापल्या घरातच संपूर्ण आदराने साजरी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांना नागरिकांनीदेखील प्रशासनाचे कान -डोळे बनवून सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.