चंद्रपूर:
शहराचे विविध क्षेत्र प्रतिबंधात्मक घोषित, ध्वनिपेक्षकांद्वारे नागरीकांना आपल्या घरीच थांबण्याच्या सुचना, पोलिसांद्वारे निवडक क्षेत्र सील, आरोग्य विभागाच्या त्वरीत हालचाली, संपुर्ण घरी तपासणी - लागोपाठ दोन दिवस चंद्रपुर शहरात होणाऱ्या या तातडीच्या हालचाली ही मनपाद्वारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली जाणारी रंगीत तालीम ( मॉकड्रील ) होय.
सद्यपरिस्थितीत चंद्रपूर शहरात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. मात्र भविष्यात जर शहरातील कुठल्याही भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती मिळाल्यास मनपा प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा तातडीने व अचुकपणे कसे कार्य करेल याची रंगीत तालीम मनपा आरोग्य विभागातर्फे सातत्याने दोन दिवस घेण्यात आली.
२५ एप्रील रोजी इंदीरानगर, भिवापूर, महेशनगर, महाकाली कॉलरी येथे व २६ एप्रिल रोजी एकोरी वार्ड, महादेव मंदीर, बाबुपेठ, सिव्हिल लाईन्स अश्या मनपाच्या ७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे असणाऱ्या विविध भागात मॉकड्रील राबविण्यात आली. सकाळी ६ वाजेपासुनच आपले क्षेत्र प्रतिबंधीत असल्याचे व नागरीकांनी आपल्या घरीच राहण्याच्या सूचना ध्वनिपेक्षकांद्वारे देण्यात येत होत्या. नागरीकांचे कुठलेही आवागमन होऊ नये, त्यांनी आपल्या घरीच राहावे याकरीता संपूर्ण परिसर सील केल्या गेला होता. अश्यातच आरोग्य विभागाच्या विविध चमु परीसरातील सर्व घरात दाखल होऊन नागरीकांची तपासणी करतात.
या दरम्यान कुठलाही नागरीक त्या परीसरातुन बाहेर पडु नये वा कोणी परीसरात दाखल होऊ नये याची काळजी पोलीस विभागातर्फे घेतल्या जात होती. कोणी पॉझिटिव्ह आढळुन आल्यास त्वरीत हालचाली करून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यास अँब्युलन्ससह इतर सर्व तयारी याप्रसंगी करण्यात आली होती. सकाळी ६ वाजता सुरु झालेली सदर मॉकड्रील परीसरातील नागरीकांची आरोग्य तपासणी झाल्यावर दुपारी २ वाजता पूर्ण करण्यात आली.
राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे युद्ध स्तरावर ' कोरोना ॲक्शन प्लॅन ' राबविला जात आहे. मनपाचे आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर व विविध विभागाचे असे १२०० कर्मचारी अहोरात्र कार्यरत यासाठी कार्यरत आहेत.
जलद, नियोजनबद्ध व अचुक हालचाली करून परिस्थीतीवर नियंत्रण मिळविणे,नागरीकांना सतर्क करणे, जागरूकता वाढविणे हाच मॉकड्रील घेण्याचा उद्देश आहे. यापुर्वीही मनपातर्फे छोट्या स्तरावर मॉकड्रील घेण्यात आली होती. आज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सारी यंत्रणाच कार्यरत आहे, त्यामुळे नागरीकांनीही सजग राहा, नियमांचे पालन करा, प्रशासनाला सहकार्य करा. चंद्रपूर शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने गाफील न राहता पुढील आदेशापर्यंत गरज नसेल तर बाहेर न पडण्याचे आवाहन आयुक्त राजेश मोहीते यांनी याप्रसंगी केले.