चंद्रपूर/प्रतींनिधी:
जिल्ह्यातील सर्व अन्नधान्य दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू ठेवण्याबाबत आदेश आहे. परंतु, विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर येथील रास्त भाव दुकानदार प्रभाकर पटकोटवार यांचे दुकान बंद आढळून आले. त्यामुळे निरीक्षण अधिकारी भारत तुंबडे व पुरवठा निरीक्षक उत्कर्षा पाटील यांच्यामार्फत सदर दुकानावर कारवाई करून सदर दुकान सील करण्यात आले.
निरीक्षण अधिकारी चंद्रपूर यांच्या दिनांक 7 एप्रिल रोजीच्या प्राप्त निरीक्षण अहवाल नुसार मौजा विठ्ठल मंदीर वार्ड, चंद्रपूर येथील रास्त भाव दुकानदार प्रभाकर पटकोटवार यांचे दुकान बंद असल्याबाबत कार्डधारक यांनी भ्रमणध्वनी द्वारे तक्रार केल्यावरून निरीक्षण अधीकारी चंद्रपुर व पुरवठा निरीक्षक चंद्रपूर शहर यांनी प्रत्यक्ष दुकानाच्या वास्तव्याच्या ठीकाणी भेट दिली असता सदर दुकान बंद असल्याचे आढळून आले.
कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासन अधीसुचना, महसुल व वन विभाग दिनांक 23 मार्च 2020 अन्वये राज्यात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील जनतेला जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व अन्नधान्य दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू ठेवण्याबाबत आदेश दिलेले आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर राज्यातील जनतेला अन्नधान्याचे "प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत धान्य प्रती व्यक्ती 5 किलो तांदुळ या प्रमाणे पुरवठा केलेला आहे.
संबधीत रास्त भाव दुकानदार यांचे दुकानात सदर योजनेचे धान्य पोहोचते होऊन सुद्धा संबधीत दुकानदार यांनी दुकान सुरू केलेले नाही. यावरून रास्त भाव दुकानदार यांचा धान्याची साठवणुक करण्याचा विचार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर दुकान सिल करण्यात आले.
सदर रास्तभाव दुकानाला संलग्न असलेल्या शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रभाकर पटकोटवार रास्त भाव दुकानदार यांचे नावे असलेल्या रास्तभाव दुकानाची शिधापत्रिका नजीकच्या पुरुषोत्तम बारसागडे मौजा विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर येथील रास्तभाव दुकानात तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशापर्यंत जोडण्यात येत आहे. अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी सुरेंद्र दांडेकर यांनी दिली आहे.