- राज्य वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या संचालक डॉ. माधवी खोडे यांच प्रतिपादन
विणकर सेवा केंद्र नागपूरमध्ये जागतिक महिला दिन साजरा
नागपूर - आज महिला ‘फार्म टू फॅब्रिक ,फॅब्रिक टू फॅशन’ या सर्व शृंखलेमध्ये आपले योगदान देत असून शेतातील कापूस वेचण्यापासून त्याचे सुत कातणे,कापड बनवणे व ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये आणणे या सर्व प्रक्रियेमध्ये महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन राज्य वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या संचालक डॉ. माधवी खोडे यांनी आज नागपूरात केले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विकास आयुक्त कार्यालयाच्या अधीन असणाऱ्या नागपूर येथील सिव्हिल लाईन स्थित विणकर सेवा केंद्रांमध्ये जागतिक महिला दिना प्रसंगी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी डॉ.सोनाली शर्मा, डॉ. रीचा जैन आणि निधी गांधी उपस्थित होत्या.
वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये मार्केटिंग महत्त्वाचे असून यासाठी ब्रॅण्डिंग आणि डिजिटल मार्केटिंगचा उपयोग जास्त प्रमाणात केला पाहिजे असे खोडे यांनी सांगितलं. महिला आता सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी आपल्या आवडीनुसार करीअर निवडावे असे आवाहन डॉक्टर खोडे यांनी यावेळी केलं.
निधी गांधी यांनी शासनाच्या योजना वस्त्रोद्योग क्षेत्रात उपलब्ध असून त्यांचा लाभ महिलांनी घ्यावा व आपल्या उत्पादनाची प्रसिद्धि समाज माध्यमातून करावी .समाज माध्यम हे महिलांच्या हाती असणारे एक प्रभावी साधन आहे, असे त्यांनी सांगितलं.
या कार्यक्रमाप्रसंगी विणकाम आणि वस्त्रोद्योग क्षेत्रांमध्ये काम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांनासुद्धा मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी काही महिलांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केलं. या कार्यक्रमाप्रसंगी विणकर सेवा केंद्रांचे सहाय्यक संचालक एस. खंडारे व कार्यालयातील कर्मचारी तसेच महिला विणकर उपस्थित होत्या.