कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासह संशयित रुग्णांवरील उपचाराबाबत आरोग्य प्रशासन योग्य खबरदारी घेत असले तरी आपत्कालीन परिस्थितीत मेयो व मेडिकलमध्ये अतिरिक्त व्यवस्था करण्याबाबत तातडीने नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केल्या. डॉ. राऊत यांनी आज या दोन्ही वैद्यकीय संस्थांची पाहणी केली.
खासदार डॉ. विकास महात्मे,आमदार मोहन मते, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, अप्पर आयुक्त अभिजीत बांगर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातूरकर व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मेयो येथील सर्जिकल कॉम्प्लेक्सला पालकमंत्र्यांनी भेट दिली. अतिरिक्त खाटांची गरज भासल्यास पुरेशी व्यवस्था करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. या ठिकाणी चौथ्या मजल्यावर अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हॅटिलेटर व अन्य साहित्य उपलब्धतेबाबत यावेळी त्यांनी माहिती घेतली. वार्डाची स्वच्छता व सुरक्षित अंतराबाबत रुग्ण व नातेवाईक यांना अवगत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. कॉम्प्लेक्समधील ऑक्सिजन पुरवठा व्यवस्था स्वतंत्र असावी असे ते म्हणाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पालकमंत्री यांनी भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी कोविड १९ हा स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाचे स्कॅनिंग करण्यात येत असल्याची माहिती अधिष्ठाता सजल मित्रा यांनी दिली. मेडिकलमध्येही 50 खाटांचा वार्ड तयार करण्यात आला आहे. कोविड १९ उपचारासाठी तयार करण्यात येणारे वार्ड आयसीएमआर व डब्ल्यूएचओच्या निकषानुसार तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. या वार्डसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असावे असे त्यांनी सांगितले.
मेडिकल व मेयो येथे येणाऱ्या रुग्णांना कोरोनाबाबत माहिती देण्यासाठी डिस्प्ले टीव्ही लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वार्डात ध्वनिक्षेपकावरून निवेदन करण्यात येत आहे.