मुंबई/प्रतिनिधी:
पुढील पाच वर्षांसाठी राज्यात दरवाढ होण्याऐवजी 7 ते 8 टक्क्याने वीजदर कमी करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने आज जाहीर केल्याने वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून यामुळे राज्यात उद्योगधंदे वाढीस चालना मिळणार असल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यास याची मदत होणार आहे, असा आशावाद राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून विजेच्या दर वाढीचा आलेख वाढतच राहिल्याने राज्यात मोठे उद्योग येत नव्हते. दर परवडत नसल्याने राज्यातून उद्योगाचे पलायन जवळच्या राज्यात होत असल्यामुळे राज्याचा विकास मंदावला होता. त्यामुळे वीजदर कमी करण्याचा प्रयत्न यावेळी ऊर्जा विभागाकडून करण्यात आला.
पहिल्यांदाच अशा प्रकारची दर कपात होत असून यामुळे सध्याच्या परिस्थितीत आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे डॉ राऊत यांनी म्हटले आहे.
विजेच्या वाढत्या दरामागे विजेची गळती कारणीभूत असल्यामुळे ऊर्जा विभागाचे सूत्र हातात घेतल्यानंतर डॉ राऊत यांनी गळती कमी करण्याच्या सूचना देऊन त्वरित गळती कमी करण्याचे आदेश दिले. तसेच वीज दर वाढू नये अशी कडक भूमिका घेतली. त्याचाच हा परिणाम असल्याचे मत ग्राहकांनी व्यक्त केले आहे. उद्योजक व वेगवेगळ्या वीज ग्राहक संघटनांनी वीज दर कमी झाल्याने आंनद व्यक्त केला असून डॉ राऊत यांचे आभार मानले आहे.
आयोगांनी दिलेल्या आदेशानुसार मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर तब्बल 10 ते 12 टक्क्यांनी कमी होणार असून घरगुती विजेकरिताचे दर 5 ते 7 टक्क्यांनी कमी होणार आहेत तर शेतीसाठीचे वीज दर 1 टक्क्यांनी कमी होणार आहेत.
मुंबईत बेस्टचे उद्योगासाठीचे वीज दर 7 ते 8 टक्क्यांनी, तर व्यवसायासाठीचे वीज दर 8 ते 9 टक्क्यांनी आणि घरगुती विजेचे दर 1 ते 2 टक्क्यांनी कमी होतील. मुंबईत बऱ्याच मोठया भागात टाटा आणि अदानी या कंपन्या वीज वितरण करतात. त्यांच्यासाठीही आयोगाने वीज दर कपात सुचविली आहे. त्यानुसार या कंपन्यांचे उद्योगासाठी विजेचे दर 18 ते 20 टक्क्यांनी तर व्यवसायासाठी विजेचे दर 19 ते 20 टक्क्यांनी आणि घरगुती वापराचे विजेचे दर तब्बल 10 ते 11 टक्क्यांनी कमी होणार आहेत.