महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेच्या सभेत ठराव
नागपूर/ प्रतिनिधी -
जिप B.Ed. प्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांमधून सेवाजेष्ठतेच्या निकषानुसार समुपदेशन घेऊन जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे तात्काळ भरण्यासाठी शिक्षण विभागाने यादी तयार करावी असा महत्वपूर्ण ठराव स्व शकुंतलाबाई घोडके प्रबोधिनी हायस्कूल, म्हाळगीनगर येथे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला.
सेनेचे राज्य सरचिटणीस तथा जिल्हा अध्यक्ष शरद भांडारकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जिप शिक्षकांचे वेतन सॅलरी प्लस योजना असलेल्या भारतीय स्टेट बँक व बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेतून करण्यात यावे, केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागा जिप शिक्षकांमधून (बी एड प्रशिक्षित) अभावितपणे तात्काळ भराव्यात, शालेय पोषण आहाराचा समावेश शिवशाही थाळीत समावेश करण्यात यावा,सेवानिवृत्त होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचे निवृत्ती वेतन प्रकरण एक महिन्याचे आंत मंजूर करावे, विषय शिक्षकांना 33% ची अट रद्द करून सरसकट पदवीधर शिक्षकांचे वेतन लागू करावे, शिक्षकांना सरसकट निवड श्रेणीचा लाभ देण्यात यावा, समग्र शिक्षा अभियान अनुदानात वाढ करण्यात यावी, सर्व मुलांना गणवेश देण्यात यावा, प्राथमिक शाळांचा (वर्ग1ते8) आठवडा पाच दिवसांचा करण्यात यावा, पं स स्तरावर महिन्यातून एकदा तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात यावा, बालसंगोपन रजा,अर्जित रजा व प्रसूती रजा तसेच रजा प्रवास सवलत, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक, भविष्य निधी अग्रीम अर्ज तात्काळ मंजूर करून मंजुरीचे पत्र देण्यात यावे, पं स नागपूर,हिंगणा व इतर तालुक्यातील समायोजन प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करण्यात यावी,सेवापुस्तकातील पेन्शन संदर्भातील सर्व नोंदी अद्यावत करण्यात याव्या इत्यादी मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले.
याशिवाय येत्या एप्रिलमध्ये जिल्हास्तरीय शिक्षक मेळावा आयोजित करणे व स्मरणिका प्रकाशित करणे, सहकारी पतसंस्था निवडणूक 2020 उमेदवारी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी संघटनेची स्वतंत्र महिला आघाडी तयार करण्यासाठी उत्कर्ष ना जि प प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष भावना काळाने यांना अधिकार देण्यात आले.
सदर बैठकीला सर्वश्री संजय चामट, मनोज घोडके,देविदास काळाने, नारायण पेठे, मोरेश्वर तडसे, नंदकिशोर उजवणे,अशोक डाहाके, अरविंद आसरे, दिपचंद पेनकांडे, हिरामण तेलंग,सुनील नासरे, राजू वैद्य, वामन सोमकुवर, चंद्रकांत मासुरकर,राजू अंबिलकर, संजय केने,प्रवीण मेश्राम,गुणवंत इखार इत्यादी उपस्थित होते.
बैठकीचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा सचिव मनोज घोडके यांनी केले.