जुन्नर/ आनंद कांबळे
कळीचं_फुल_व्हावं_इतक्या_सहजपणे_येत_खरंतर_तरुणपण! पण प्रसारमाध्यमे आणि इंटरनेटच्या विळख्यामुळे हा प्रवास दिवसेंदिवस अधिक खडतर अन काटेरी होत चालला आहे हे आपण सर्वजण अस्वस्थपणे पाहतो आहोत. या विषयावर नुसतीच चर्चा करण्याऐवजी एक कृतीशील पाऊल उचलावं म्हणून तरुणाईला विचारांची एक नवी दिशा देणाऱ्या "तारुण्यभान" या कार्यशाळेचे जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि.१३ ते १५ फेब्रुवारी २०२० यादरम्यान करण्यात आले होते.
स्वतःच्या लैंगिकतेविषयी, भावनांविषयी, मूल्यांविषयी, प्रेरणांविषयी, स्वप्नांविषयी निरोगी समज तयार व्हावा म्हणून अथकपणे प्रयत्न करणाऱ्या सुप्रसिद्ध समाजसेविका, जेष्ठ स्त्रीरोगतज्ञ, पद्मश्री_डॉ . राणी_बंग या स्वतः ३ दिवस जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलां-मुलींना हा विषय समजावून सांगत होत्या.
वयात आल्यावर जागृत होणारे कुतूहल आणि पुरुष आणि स्त्री प्रजनन इंद्रिये कॅन्सर हा विषय डॉ. राणी बंग यांच्या कडून समजून घेणे हा एक विलक्षण अनुभव असल्याचं मुलांच्या प्रतिक्रियेवरून दिसून आलं.
तारुण्यभान शिबिरातील मजकूर डॉ राणी बंग यांनी तीस वर्षांचे संशोधन व त्यातील भाग घेणाऱ्या युवक युवतींच्या प्रतिसदाचे मूल्यमापन करून निश्चित करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांनी खुलेपणाने डॉ राणी बंग यांच्यासोबत चर्चा केली.
यामध्ये वयात येताना होणारे शारीरिक व मानसिक बदल, आकर्षण व खरे प्रेम यातील फरक, प्रजनन इंद्रिये:रचना व कार्य, जबाबदार पालकत्व व योग्य जोडीदाराची निवड,मासिक पाळी दरम्यानची काळजी व स्वच्छता, हस्तमैथुन व स्वप्नदोष, वंध्यत्व, कुटुंब नियोजन व साधने, कर्करोग, विवाह व वैवाहिक जीवन, तारुण्यातील जबाबदार वर्तन इ. विषयांचा समावेश होता. तसेच या तारुण्यभान उपक्रमात खेळ, गाणी, गटचर्चा व गोष्टी यांचा समावेश होता.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी चे अध्यक्ष धनंजय राजुरकर, सचिव संतोष काजळे, खजिनदार सचिन ताथेड , उपाध्यक्ष पवन गाडेकर,प्रोजेक्ट ईंचार्ज विजय कोल्हे, माजी अध्यक्ष तुषार लाहोरकर, विनायक कर्पे, चेतन शहा,सुनील जाधव, रुपेश शहा गोकुळ भागवत, मिलिंद घोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अन्यायाविरुद्ध, अत्याचारविरुद्ध आवाज उठवला तरच समाजातील अन्याय ,अत्याचार दूर होईल, व्यसनाधीनतेमुळे पिढ्या बरबाद होत आहेत त्यामुळे वेळीच सावध व्हा, व्यसनाधीनतेचा समूळ उच्चाटन करा. याविरुद्ध लढण्यासाठी ज्ञानाचे हत्यार घेऊन लढा, कारण पैसा, प्रतिष्ठा, आयुष्य हे संपत जाते परुंतु चिरकाल टिकते ते केवळ ज्ञान असे मत डॉ रानीताई बंग यांनी व्यक्त केले.