महापौरांनी दिला खेळाद्वारे स्वस्थ व मस्त राहण्याचा मूलमंत्र
चंद्रपूर - शरीर स्वाथ्यासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. विद्यार्थी जीवनात शिस्त, धैर्य, साहस, आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमंध्ये खेळांची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. शालेय क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या होणाऱ्या कौतुकामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रतिभा आहेत त्या उजळून येण्यास मनपाचे शालेय क्रीडासत्र ही एक संधी असल्याचे प्रतिपादन महापौर सौ राखी कंचर्लावार यांनी केले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजीत शालेय क्रीडासत्र २०१९-२० या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.उपस्थीत मनपाच्या ३२ शाळातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या की, खो-खो,कबड्डी या मैदानी खेळांमुळे आपले मातीशी नाते जुळते तसेच बौद्धिक,मानसिक व शारीरीक क्षमता वाढण्यास मदत होते. या वयातच खेळभावना वाढीस लागते. स्पर्धेदरम्यान पंचांनी आपल्या भूमिकेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये खेळभावना जागृत करण्यास मदत करावी. मुलांचा आनंद हाच आपल्या सर्वांचा आनंद आहे. आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात व प्रशासन अधिकारी नागेश नीत यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात मनपाच्या शाळांनी आधुनिकतेची कास धरली आहे. मनपाच्या शाळा, शिक्षक अतिशय चांगले काम करीत आहेत. या शाळकरी मुलांच्या उत्साहाद्वारे आज आपण क्रीडासत्र उत्सवाला प्रारंभ करीत असल्याचे प्रतिपादन महापौर सौ राखी कंचर्लावार यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती श्री. राहुल पावडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख अतिथी आयुक्त श्री. संजय काकडे, महिला व बालकल्याण सभापती सौ. शीतल गुरनुले,उपसभापती सौ. चंद्रकला सोयाम, उपायुक्त श्री. गजानन बोकडे, झोन १ सभापती श्री. प्रशांत चौधरी, झोन २ सभापती सौ. कल्पना बागुलकर, झोन ३ सभापती श्री. सुरेश पचारे,नगरसेवक रवी आसवानी, प्रदीप किरमे, अशोक आक्केवार, प्रशासन अधिकारी ( शिक्षण ) श्री. नागेश नीत उपस्थित होते.
याप्रसंगी संबोधित करतांना उपमहापौर व स्थायी समिती सभापती श्री. राहुल पावडे म्हणाले की, मुलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा याकरिता मनपा क्रीडासत्र दरवर्षी आयोजित करते. आज या क्रीडासत्रात मनपाच्या शाळांमधील ७०० विद्यार्थी दररोज सहभाग घेणार आहेत. मनपा शाळांमधील मुले गरीब घरची आहेत. महानगरपालिका कुठलीही फी न आकारता त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करते आहे. मध्यान्न भोजनाच्या रूपात पोषक आहार विद्यार्थ्यांना दिला जातो. विद्यार्थ्यांमधे बौद्धिक व खेळगुण विकसित करण्यास मनपा शिक्षक प्रयत्नशील आहेत. आयुष्यात लक्ष्य निश्चित असेल तर कुठलीही गोष्ट कठीण नसते. जोड हवी असते जिद्दीची. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परिश्रम घ्यावे. उपस्थित विद्यार्थ्यांनी या क्रीडासत्रात जोमाने भाग घ्यावा व खेळभावनेतून आपल्या शाळांचे आपले, आपल्या पालकांचे, शाळेचे नाव लौकिकास आणावे. याप्रसंगी महापौर यांनी खेळाडूंना व उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती श्री. राहुल पावडे यांनी पंचांना शपथ दिली. उदघाटनप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ड्रीलने तसेच विविध नृत्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन अधिकारी श्री. नागेश नीत, प्रमुख कार्यवाह शरद शेंडे यांनी परिश्रम घेतले. संचालन बबिता उईके यांनी केले. कार्यक्रमाला मनपाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.