स्पर्धेतून कर्मचाऱ्यांमधील सांघिकता आणि कार्यकुशलता वाढीस लागेल: संचालक (मानव संसाधन) पी .के. गंजू
नागपूर - चांगल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत खेळाचे मोलाचे योगदान असते. अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धेतून कर्मचाऱ्यांमधील सांघिकता आणि कार्यकुशलता वाढीस लागेल, असा विश्वास महावितरणचे संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडियर (निवृत्त ) पी .के. गंजू यांनी व्यक्त केला. महावितरणच्या तीन दिवसियराज्यस्तरीय आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आज शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2020 ला पी .के. गंजू यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक व राज्य आंतर परिमंडळ क्रीडा स्पर्धा 2019-20 आयोजन समितीचे अध्यक्ष दिलीप घुगल यांनीही खेळाडुंना मोलाचे मार्गदर्शन केले.
रवी नगर येथिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी मुख्य अभियंता (गुणवत्ता व नियंत्रण) सुहास रंगारी, पुणे परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री सुनील पावडे, श्री.भूजंग खंदारे (मुख्यालय), मुख्य अभियंता श्री. अनिल भोसले (कोल्हापूर), श्री. सुरेश गणेशकर (औरंगाबाद), श्री. ब्रिजपालसिंह जनवीर (नाशिक), सुखदेव शेरकर (गोंदिया),सुनील देशपांडे (चंद्रपूर), अनिल डोये (अकोला), प्रभारी मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे मुख्य समन्व्यक मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री.संजय ढोके यांनी स्पर्धेच्या आयोजनाची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयोजन समितीचे सचिव तथा नागपूर परिमंडलाचे उपमुख्य औद्योगिक बंध अधिकारी श्री मधुसुदन मराठे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन किशोर गलांडे आणि गुप्ता यांनी केले. यावेळी सर्व खेळाडुंनी संचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली. राष्ट्रीय खेळाडू सरिता सरोटे आणि महेश गुजरकर यांनी क्रीडा ज्योत पेटवली. तर विदर्भाचा रणजी क्रिकेट खेळाडू मंगेश समदूरकर यांनी उपस्थित सर्व खेळाडूंना शपथ दिली. यावेळी भोसला मिलिटरी स्कूलच्या बँड पथकाने उत्कृष्ट संचालन केले.
उदघाटनानंतर लगेच झालेल्या महिला गटातील 100 मीटर धावणाच्या स्पर्धेत मुंबई मुख्यालयाच्या प्रिया पाटील ही सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तिनें हे अंतर 10.8 सेकंदात पूर्ण केले. तर दुसऱ्या क्रमांकावरील कल्याण परिमंडलाच्या नम्रता पाटीलने हे अंतर 15.63 सेकंद मध्ये पूर्ण केले.