- ‘वर्षा जलसंवर्धन समिती’च्या बैठकीत निर्णय
- समिती गठीत करून होणार योग्य कार्यवाही
नागपूर, ता. ५ : शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच यावर्षी पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्यात आली. भविष्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेता पाण्याचे संवर्धन हे अत्यंत आवश्यक आहे. मात्र पाण्याचे संवर्धन करण्यासाठी शहरात ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ होणे आवश्यक आहे. यासाठी मनपाने पुढाकार घेउन मुख्यालय परिसरात ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ करून घेतले. मात्र संपूर्ण शहरात याबाबत जागृती व्हावी व त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वप्रथम सर्व शासकीय कार्यालय, खासगी संस्था, शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ करण्यात यावी व त्याबाबत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, असा निर्णय ‘वर्षा जलसंवर्धन समिती’च्या बैठकीत घेण्यात आला.
नागपूर शहरात ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’चे शास्त्रोक्त कार्य होण्याकरिता सहभागी संस्था व प्रशासन यांच्या समन्वयातून सहकार्यासाठी महापौरांतर्फे गठीत ‘वर्षा जलसंवर्धन समिती’ची गुरूवारी (ता.५) बैठक घेण्यात आली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत समिती सदस्य तथा स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती अभय गोटेकर, बैठकीतील विशेष आमंत्रित सदस्य जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक संचालक नगररचना प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता (नासुप्र) पी.पी.धनकर, एस.एम.पोहेकर, मनपा उपअभियंता कमलेश चव्हाण, अभियंता नगररचना राजीव गौतम, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा नागपूरच्या वरीष्ठ भूवैज्ञानिक वर्षा माने, भूवैज्ञानिक आर.के.देशकर, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे महाव्यवस्थापक (पर्यावरण) देवेंद्र महाजन, वरीष्ठ वास्तुविशारद अशोक मोखा, टिचर सामाजिक कार्यकर्ता रोहित देशपांडे, असोसिएशन ऑफ लॉयसन्स इंजिनिअर्सचे मधुकर सेलोटे, सीपीएस इव्हायरो टेकचे मंगेश देशपांडे, एनएसएससीडीसीएल चे डॉ.पराग अरमाल आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितीत विविध विभागांचे अधिकारी तथा स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिका-यांनी आपल्या सूचना मांडल्या. नागपूर शहरामध्ये ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ करताना ते केवळ जमिनीत पाणी मुरविण्याच्या पद्धतीनेच राबविणे हे प्रत्येक ठिकाणी शक्य नाही. शहरातील जमिनीचा, भूगर्भाचा पूरेपूर अभ्यास केल्यास ते कुठे शक्य आहे हे लक्षात येईल. त्यामुळे सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून त्यावर अंमलबजावणी व्हावी. याशिवाय पाण्याची साठवणूक करून त्यावर योग्य प्रक्रिया करूनही ते वापरात आणल्यास ब-यापैकी पाणी बचत होउ शकेल. याबाबतही जागेची उपलब्धता आणि त्याचे सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरेल असे तंत्रज्ञान यावर अभ्यास करण्याच्या सूचना यावेळी मांडण्यात आल्या.
‘रेन वाटर हार्वेस्टिंग’बाबत आवश्यक तांत्रिक अभ्यास करण्यात यावा. यासोबतच शहरात जनजागृती होणेही आवश्यक आहे. यासाठी प्रारंभी निवासी क्षेत्रांना सक्ती न करता सुरूवातीला शासकीय इमारती, खासगी संस्थांच्या इमारती तसेच सर्व शाळा, महाविद्यालय येथे ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’बाबत सक्ती करण्यात यावी. या संस्थांमधील जागेची उपलब्धता आणि तिथे अनुकूल अशी ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ची पद्धती याबाबत अभ्यासपूर्ण माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठी मनपातर्फे तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात येणार आहे. ही समिती शहराच्या भौगोलिक रचनेनुसार ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ व त्याच्या विविध पद्धतीचा अभ्यास करून त्याची पुस्तिका तयार करेल. ही पुस्तिका सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी संस्था, शाळा, महाविद्यालयांना सादर करून त्यांना अनुकूल पद्धतीद्वारे ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ करण्याबाबत माहिती देईल. या सर्व संस्थांमध्ये ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ करण्याबाबत मनपातर्फे सक्ती करण्याचाही निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला.