78 हजार 64 बालकेना लसीकरणाचे नियोजन
- मुख्य सचिव अजोय मेहता
मुंबई, दि. 5 : राज्यात मिशन इंद्रधनुष विशेष मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु झाला असून 25 जिल्हे आणि 20 महानगरपालिका क्षेत्रातील 78 हजार 64 बालके आणि 11 हजार 977 गर्भवती महिलांना लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हाधिकारी,महापालिका आयुक्त आणि जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. त्याचबरोबर समाजातील विविध घटकांना, सामाजिक नेत्यांना सोबत घेऊन ही मोहिम यशस्वी करावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले.
या लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी सुकाणू समितीची बैठक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य सचिवांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला.
अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा,चंद्रपूर, गोंदीया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी,पालघर-वसई- विरार, रायगड-पनवेल, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग, वर्धा, वाशिम, नाशिक-मालेगाव, ठाणे-कल्याण डोंबिवली, मिरा-भाईंदर,भिवंडी, नवी मुंबई, उल्हासनगर, बृहन्मुंबई या जिल्हा आणि महापालिका क्षेत्रांमध्ये ही मोहिम राबविण्यात येत असून 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालके आणि गर्भवती महिलांचे लसीकरण केले जाणार आहे.
डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या चार महिन्यांमध्ये आठवडाभर ही मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेकरिता निवडलेल्या जिल्ह्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून लसीकरणापासून वंचित राहिलेली बालके आणि गर्भवती महिलांची आकडेवारी निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हा आणि महापालिकेला लसीकरणाचे उद्दिष्ट दिले असून त्याच्या शंभर टक्के पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संनियंत्रण करावे, लसीकरण झालेल्या ठिकाणी अचानक भेटी देऊन लसीकरणाची खात्री करावी, असे निर्देश मुख्य सचिवांनी यावेळी दिले.
ज्या भागात ऊसतोड अथवा अन्य कामांसाठी स्थलांतर झाले आहे. अशा स्थलांतरीत बालक आणि महिलांची यादी आरोग्य विभागाला द्यावी जेणेकरुन त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन लसीकरण पूर्ण केले जाईल. काही भागात लसीकरणाला विरोध आहे तेथे समुदायाला विश्वासात घेऊन तसेच समाजातील मान्यवरांची मदत घेऊन लसीकरण करुन घेण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असेही मुख्य सचिवांनी सांगितले.
बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय मुखर्जी , ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य आयुक्त अनुपकूमार यादव,एकात्मिक बालविकास प्रकल्प संचालक श्रीमती इंद्रा मालो जैन, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. साधना तायडे आदी उपस्थित होते.