महापौरांनी केले निरीक्षण
पथदिवे, फ्लोरिंगदुरुस्तीसंदर्भात दिले निर्देश
नागपूर :
शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गांधीसागर तलावाच्या एका काठावरील ‘खाऊ गल्ली’ लवकरच नागरिकांसाठी सुरू होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या खाऊ गल्लीचे निरीक्षण महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी (ता. ७) केले आणि तातडीने दुरुस्तीसंदर्भात संबंधितांना निर्देश दिले.
महापौर संदीप जोशी यांनी सकाळी १० वाजता खाऊ गल्लीचे निरीक्षण केले. यावेळी त्यांच्यासोबत क्रीडा सभापती प्रमोद चिखले, नगरसेविका हर्षला साबळे, नगरसेवक विजय चुटेले, धंतोली झोन सहायक आयुक्त किरण बगडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, माजी नगरसेवक मनोज साबळे उपस्थित होते.
महापौर संदीप जोशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राबविलेल्या ‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर’ आणि ‘ब्रेकफास्ट विथ मेयर’ या उपक्रमादरम्यान गांधीसागर लगतच्या खाऊ गल्लीसंदर्भात अनेकांनी सांगितले. नागपूर महानगरपालिकेने नागपूरकरांसाठी इतके सुंदर स्थळ बनविले असतानाही त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तेथे असामाजिक तत्त्वांचा वावर वाढल्याचे नागरिकांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. नागरिकांच्या या तक्रारीची दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी १ डिसेंबर रोजी मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर आयोजित ‘ब्रेकफास्ट विथ मेयर’ या कार्यक्रमात १ जानेवारी रोजी खाऊ गल्ली नागरिकांसाठी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. ७) सकाळी १० वाजता त्यांनी खाऊ गल्लीचा निरीक्षण दौरा केला. खाऊ गल्लीतील पार्किंगमधील फ्लोरिंग तुटलेले असून त्यासंदर्भात शॉर्ट टेंडर काढून सात दिवसाच्या आत काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निरीक्षणादरम्यान उपस्थित असलेल्या नगरसेवकांच्या निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये घेऊन त्यातून आय ब्लॉक दुरुस्त करण्याचे ठरविण्यात आले. याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
खाऊ गल्ली पार्किंग स्थळी ठळक अक्षरात फलक लावणे, तेथे येणाऱ्या नागरिकांसाठी वॉटर ए.टी.एम. सुरू करणे,परिसरातील सर्व पथदिवे तातडीने सुरू करणे, तलावाच्या रेलिंगला लागून असलेली झुडुपे, गवत काढण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. परिसरातील दैनंदिन साफसफाईची जबाबदारी प्रभागाचे आरोग्य अधिकारी श्री. गायधने यांच्याकडे सोपविण्यात आली. महापौर संदीप जोशी यांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी तातडीने होते अथवा नाही ह्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सहायक आयुक्त किरण बागडे आणि उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांच्यावर निश्चित करण्यात आली. या कार्यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापौर संदीप जोशी यांनी यावेळी दिला. दिलेल्या निर्देशानुसार काम झाले अथवा नाही याबाबत आढावा घेण्यासाठी ते २० डिसेंबर रोजी पुन्हा खाऊ गल्लीचा निरीक्षण दौरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.