चार स्थरीय वाहतूक प्रणाली, विविध मेट्रो स्टेशनसह आसोली कास्टिंग यार्ड व मिहान डेपोची केली पाहणी
नागपूर १२: महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी तीन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या के.एफ.डब्लू. जर्मनी आणि ए.एफ.डी फ्रांस या दोन्ही शिष्टमंडळाने आज तिसऱ्या व शेवटच्या दिवशी विविध ठिकाणी भेट देऊन त्याठिकाणी सुरु असलेल्या कार्याच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली. आज अखेरच्या दिवशी पाहणीला सुरवात करण्यापूर्वी दोन्ही शिष्टमंडळाची महा मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात होणाऱ्या कार्याची विशेषतः रिच-२ आणि रिच-४ येथे सुरु असलेले कार्य आणि नियोजनाची माहिती के.एफ.डब्लू. आणि ए.एफ.डी अधिकाऱ्यांना देण्यात आली.
के.एफ.डब्लू. आणि ए.एफ.डी अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या गटात प्रकल्पाची पाहणी केली. सुरवातीला रिच-२ आणि रिच-४ चे आगामी दिवसात होणाऱ्या कार्याचे नियोजन व कार्य कधी पर्यंत पूर्ण होणार यावर सविस्तर माहिती शिष्टमंडळाने जाणून घेतली. यानंतर रिच-२ अंतर्गत येणाऱ्या गद्दीगोदाम भागातील प्रॉपर्टी डेव्हल्पमेंट साईट व प्रामुख्याने याठिकाणी तयार होणाऱ्या चार स्थरीय वाहतूक व्यवस्थेच्या कार्याची पाहणी करण्यात आली. तसेच झिरो माईल मेट्रो स्टेशनवर भेट देऊन येथील कार्याचा आढावा त्यांनी घेतला. तर रिच-४ अंतर्गत आसोलीचे कास्टिंग यार्ड, येथील लेबर कॉलोनी, अग्रसेन चौकातील प्रकल्पाचे कार्य, कॉटन मार्केट परिसरातील कॅन्टीलिव्हर ब्रिज या कार्याचे प्रत्यक्ष निरीक्षण शिष्टमंडळातर्फे करण्यात आले.
रिच-२ आणि रिच-४ मध्ये निर्माणाधीन कार्यासह रिच-३ अंतर्गत हिंगणा मार्गावरील सुभाष नगर मेट्रो स्टेशन व रिच-१ अंतर्गत जय प्रकाश मेट्रो स्टेशन तसेच मिहान डेपोमधील कोच वॉश प्रणालीचे निरीक्षण करून यासर्व ठिकाणी झालेल्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. एकंदरीत तीन दिवसीय दौऱ्यावर के.एफ.डब्लू. आणि ए.एफ.डी शिष्टमंडळाने प्रकल्पात झालेल्या व सुरु असलेल्या कार्यावर समाधान व्यक्त केले. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या संयुक्त देखरेख मिशन अंतर्गत प्रकल्पाची अंबलबजावणी कश्या प्रकारे सुरु आहे? व तांत्रिकी, वित्तीय तसेच इएसएचएस दृष्टीकोन तपासण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महा मेट्रोतर्फे संचालक (प्रकल्प) श्री.महेश कुमार,संचालक(वित्त) श्री. एस.शिवमाथन संचालक (प्रकल्प नियोजन) श्री.रामनाथ सुब्रमण्यम, कार्यकारी संचालक (प्रशासन) श्री.अनिल कोकाटे,कार्यकारी संचालक(रिच -२) श्री. महादेवस्वामी,मुख्य प्रकल्प व्यवस्थापक(रोलिंग स्टॉक) श्री.राजेश कुमार पटेल उपस्थित होते.