अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर ने केला जप्त
चंद्रपूर, दि. 30 नोव्हेंबर : अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर या कार्यालयाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी अ.या सोनटक्के यांनी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलरी स्थित मे.गणेश किराणा अँड कन्फेक्शनरी या आस्थापनेची सखोल तपासणी केली असता आस्थापनेचे मालक गणेश धृपप्रसाद गुप्ता, वय 30वर्ष यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थ सुगंधी तंबाखू, रजनीगंधा पान मसाला, विमल पानमसाला, रोज व अन्नी स्विट सुपारी इत्यादीचा रुपये 38040 चा साठा विक्रीसाठी बाळगण्याचे आढळून आले. आस्थापनेचे मालक गणेश धृपप्रसाद गुप्ता या विक्रेत्यांविरुद्ध पोलिस स्टेशन, रामनगर येथे एफ.आय.आर नोंदविण्यात आला आहे.
जे कोणी अन्न व्यवसायिक खर्रा, गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू, तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थ उत्पादन, साठा,वितरण, विक्री, वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांचेवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 59 कारवाई होऊन 6 वर्षाचा कारावास व रुपये 5 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर यांच्या अंतर्गत करण्यात आले आहे.