चंद्रपूर, दि. 30 नोव्हेंबर : आदिवासी समाजातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्या भावी जीवनातील उत्कृष्ट वाटचालीकरिता आणि पारंपरिक कलागुणांच्या संवर्धनाकरिता आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या नागपूर विभागांतर्गत दिनांक 1 डिसेंबर 2019 ते 4 डिसेंबर 2019 या कालावधीत विभागीय क्रीडा स्पर्धा विज्ञान व चित्रकला प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
आदिवासी विकास विभागाच्या नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आज दिनांक 1 डिसेंबर 2019 रोजी जिल्हा पोलीस मैदान बस स्टँड जवळ चंद्रपूर येथे खासदार सुरेश धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद चंद्रपूर चे अध्यक्ष देवराव भोंगळे राहतील. विशेष अतिथी म्हणून महापौर राखी कंचलवार, खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य नागो गाणार, विधानपरिषद सदस्य अनिल सोले, विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार किर्तिकुमार भांगडिया, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार ,आमदार प्रतिभाताई धानोरकर, प्रकल्पस्तरीय नियोजन आढावा समिती अध्यक्ष यशवंत वाघ हे उपस्थित राहतील. प्रमुख अतिथी म्हणून अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपुर डॉ .संदीप राठोड, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मुख्य वनसंरक्षक ए.स.टी रामाराव, प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, नागपूर विभागातील सर्व प्रकल्प अधिकारी तथा जिल्हा क्रीडा अधिकारी उपस्थित राहतील.
असा असणार उद्घाटन समारंभ
सर्व प्रकल्पातील खेळाडूंचे आकर्षक पथसंचलन होणार असून चंद्रपुर चिमुर, भामरागड ,अहेरी, गडचिरोली, देवरी, भंडारा, नागपूर व वर्धा प्रकल्पाद्वारे त्यांच्या क्षेत्रातील सांस्कृतिक व भौगोलिक वैशिष्ट्यांचे प्रदर्शन आकर्षक देखावे द्वारे केले जाणार आहे. या सोबतच विज्ञान प्रदर्शनी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या क्रीडा स्पर्धांचा थरार
या चार दिवसीय क्रीडा स्पर्धांच्या महासंग्रामाला नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या 9 प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळातील 2300 आदिवासी खेळाडू भाग घेणार असून यामध्ये कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, हॅन्ड बॉल या सांघिक तसेच लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे व चालणे इत्यादी वैयक्तिक खेळात आपल्यातील उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करणार आहे. या सर्व प्रकल्पातील खेळाडूंना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करता यावे याकरिता दिनांक 2 व 3 डिसेंबरला सायंकाळी 7 ते 9 या कालावधीत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलीस मैदान चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.
दिनांक 4 डिसेंबर ला होणार क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम
विभागीय क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम बुधवार 4 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजित केले आहे. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार हे असतील तर, प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे उपस्थित राहतील. चंद्रपूरकरांनी या स्पर्धांचा आनंद घ्यावा व खेळाडूंचे उत्साहवर्धन करावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी केशव बावनकर यांनी केले आहे.