सक्त मजुरीची शिक्षा
नागपूर/प्रतिनिधी:
अकोला मंडळ कार्यालयाअंतर्गत असलेल्या पातूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कापशी येथील लाईनमन यांना मारहाण करणाऱ्या तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या कापशी येथील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने एक वर्षाच्या सक्त कारावासाची शिक्षा काल दिनांक २७ नोव्हेंबरला सुनावली आहे . यासोबतच दोन हजार रुपये दंड ठोठावला असून ,दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्याच्या शिक्षेचे प्रावधानही न्यायालयाने केले आहे . हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश एन . जी . शुक्ला यांच्या न्यायालयाने दिला आहे.
कापशी येथे तत्कालीन कार्यरत असलेले लाईनमन राजाराम महादेव मांजरे हे कापशी येथील कार्यालयात कार्यरत असतांना दिनांक १९ ऑगस्ट २०१३ रोजी हरीलाल गिरिधारी केवट हा तिथे आला आणि मांजरे यांच्याशी अर्वाच्य भाषेत संभाषण करीत त्यांना शिवीगाळ केली. लाईनमन मांजरे यांनी विरोध केला असता हरीलाल केवट याने मांजरे यांना थापड बुक्यांनी मारहान करणे सुरू केले,तसेच टेबलावर असलेली कागदपत्रे फेकफाक करून जीवे मारण्याची धमकीही दिली . यावेळी अभियंता अमोल लखडे यांनी हरिलाल केवट यांच्या तावडीतून मांजरे यांची सुटका केली. त्यानंतर राजाराम मांजरे यांनी या प्रकरणाची तक्रार पातूर पोलीस ठाण्यात दिली होती .
यावरून पोलिसांनी कापशी येथील रहीवाशी असलेले हरिलाल केवट यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याची धमकी देणे या आरोपाखाली, भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास पातूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी मधुकर लिल्हारे यांनी करून दोषरोपपत्र विद्यमान न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच साक्षीदार तपासल्यानंतर हरिलाल केवट यांच्याविरुद्ध आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे त्याला भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३ अन्वये एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. यासोबतच दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी दोन महिन्याच्या सक्त मजूरीचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
भारतीय दंड विधानाच्या कलम ५०६अन्वये एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा तसेच एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी दोन महिन्याच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.या प्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने अड. राजेश अकोटकर यांनी कामकाज पहिले.