Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर १४, २०१९

सक्षम महिला बचत गटांचा जिल्हा ही चंद्रपूरची ओळख देश पातळीवर व्हावी


v  चंद्रपूरातील बचत गटाच्या मेळाव्यामध्ये पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
v  महिला बचत गटांना पतपुरवठा मोठ्या प्रमाणात करण्याचे निर्देश
v  महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेपर्यंत बचत गटांचा लढा सुरू ठेवा
v  प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील संबोधित केले

चंद्रपूर दि 14 सप्टेंबर : भारत स्वतंत्र झाला तरी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा लढा आणखी बाकी असून महिला बचत गटांमार्फत 50 टक्के समुदायांना आर्थिक संपन्न बनविणे हे या बचत गटाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती मदत शासनस्तरावरून केली जात आहे. या चळवळीमध्ये माझा गृह जिल्हा असणारा चंद्रपूर हा जगाच्या पातळीवर सर्वात उत्तम जिल्हा म्हणून पुढे यावा, यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
      प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महिला सबळीकरण हे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी महिला बचत गटांना किमान व्याजदर योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासन सुद्धा यासाठी आग्रही असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही चळवळ महिलांच्या आर्थिक उत्थानाची चळवळ बनवा असे, आवाहनही त्यांनी यावेळी केले.
      महापौर अंजलीताई घोटेकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ, आयुक्त संजय काकडे, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, सभापती शितल ताई गुरनुले, चंद्रकला सोयाम,माजी महापौर राखी कंचर्लावार, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, शिखर बँकेचे समन्वयक एस. एन. झा यांच्यासह मनपाच्या नगरसेविकांची  उपस्थिती होती.
       प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या सेवा सप्ताह चालू असून त्यामध्ये भव्य महिला बचत गट महामेळावा आयोजित करण्यात आला होता. पंडित दीनदयाळ उपाध्याय प्राथमिक शाळा तुकुम येथे चंद्रपूर महानगरातील महिला बचत गटांचा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
      त्यावेळी संबोधित करताना ते म्हणाले क्रांतीज्योती बाई फुले , राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर,झाशीची राणी लक्ष्मीबाई, आदी महिलांची नावे घेताना ज्या आवेशात आम्ही जयजयकार करतो.त्याच आवेशात आमचे प्रयत्न असले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत सत्याची साथ आम्ही सोडता कामा नये. क्रांती ज्योतीच्या परिवर्तनाची ज्योत हाती घेऊन आम्हाला पुढे यावे लागेल. त्यासाठी सिद्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
       निसर्गाकडून महिलांना काही वरदान मिळाले आहे. पुरुषांपेक्षा महिलांचे सरासरी वयोमान देखील अधिक आहे. जगामध्ये सर्वाधिक सहनशक्ती ही महिलांकडे आहे. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीमध्ये धीरोदात्तपणे उभे राहण्याची ताकद महिलांमध्ये आहे. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अनेक वेळा लक्षात आले की, शेतीचे व्यवस्थापन करण्यात अपयश आल्यानंतर शेतकरी आत्महत्या करतात. मात्र तीच परिस्थिती, तेच कर्ज, असताना महिला समर्थपणे परिस्थितीचा सामना करते. उलट त्यातून मार्ग काढते.
      महिलांच्या या सामर्थ्याचे, महिलांच्या उत्तम व्यवहार ज्ञानाचा वापर करणे, गरजेचे आहे. गुणवत्ता यादीत देखील मुलींची संख्या अधिक आहे. अशा मुलींना आपण आता आर्थिक स्वातंत्र्याच्या लढयामध्ये आणखी सक्रियतेने सहभागी केले पाहिजे. बचत गटांना समर्थ करून सामाजिक व्यवसायाकडे वळविले पाहिजे. यासाठी बँकांनी देखील पुढे यावे, असे आवाहन यावेळी उपस्थित बँक अधिकाऱ्यांना केले.
     कार्यक्रमाला चित्राताई वाघ यांनी देखील संबोधित करून महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्य मिळवावे असे स्पष्ट केले. महापौर अंजलीताई घोटेकर यांनी देखील या वेळी महिलांना संबोधित केले. चंद्रपूर महानगरातील बचत गट मोहीम आणखी सक्रीय करण्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महानगरपालिकेच्या नगरसेविका व परिसरातील महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.