मनोज चिचघरे ,भंडारा जिल्हा प्रतिनिधी :
भंडारा जिल्ह्यातील भंडारा विधानसभा क्षेत्र या नावाने प्रसिद्ध असलेले विधानसभा क्षेत्र हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. सन 2009 मध्ये भाजपा सेना युतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर निवडून आले होते. तर सन 2014 मध्ये भाजपा स्वतंत्र लढली होती व भाजपाचे अॅड. रामचंद्र अवसरे निवडून आले होते.
परंतु आता भंडारा विधानसभा क्षेत्राचे चित्र बदललेले असून विद्यमान आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांच्या विषयी जनतेमध्येच नव्हे तर भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर रोष असून भाजपाचा अनुसूचित जातीच्या बौद्ध समाजातील नवा चेहरा म्हणून माजी न्यायाधीश तथा जिल्हा उपाध्यक्ष अॅड. महेंद्र गोस्वामी यांचे नाव आघाडीवर आहे.
त्यांनी महाविद्यालयीन जिवनापासून विद्यार्थी संघटनेमध्ये काम केले असून रिपब्लिकन चळवळीमध्ये देखील काम केले आहे. न्यायाधीश म्हणून नोकरीला जाईपर्यंत विविध सामाजिक व राजकीय स्वरूपाची कामं करून लोकांना मदत केली आहे. एवढेच नव्हे तर लोकांवर होणा-या अन्यायाला वाचा फोडली असून रस्त्यावर उतरून विविध आंदोलन केले आहेत. तसेच त्यांनी दैनिक लोकसत्ता मध्ये प्रतिनिधी म्हणून देखील काम केले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या एकूण कार्यावर विश्वास ठेवून सन 2014 मध्ये भाजपा मध्ये प्रवेश केला असून सध्या भंडारा जिल्हा भाजपा उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. सन 2017 मध्ये पार पडलेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत लाखांदूर तालुक्याची जबाबदारी देण्यात आली होती व त्या निवडणुकीत त्यांनी 33 सरपंच निवडून आणण्याचे काम केले.तसेच लोकसभेच्या निवडणुकामध्ये त्यांनी चांगले काम केले असून ही त्यांची जमेची बाजू आहे.
भाजपा सदस्यता मोहिमे अंतर्गत भंडारा जिल्हा भाजपाचे सह संयोजक म्हणून काम केले असून मोठ्या संख्येने सभासद नोंदणी केली आहे. प्रामुख्याने मुस्लिम युवकांना भाजपाची सदस्यता प्रदान केली आहे.
भंडारा विधानसभा क्षेत्र हे अनुसूचित जाती साठी राखीव असल्यामुळे व ही शेवटची संधी असल्यामुळे या क्षेत्रातून भाजपा तर्फे उमेदवारी मिळण्यासाठी अनेक जन गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत, परंतु या सर्व उमेदवारांमध्ये माजी न्यायाधीश अॅड महेंद्र गोस्वामी हे प्रबळ व सरस उमेदवार असून त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. याचा फायदा भाजपाला होवू शकतो.