महावितरणने नव्यानेच कामकाज सांभाळलेल्या महाल. गांधीबाग आणि सिव्हिल लाईन्स या भागात येणाऱ्या उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी लक्ष्यात घेऊन या भागात आतापासून कामाचे नियोजन करण्याची सूचना महावितरण, नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक आणि परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी आज येथे आयोजित आढावा बैठकीत दिली.
विदुयत भवन, काटोल रोड येथील कार्यालयात आज महावितरण, नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक आणि परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी मंगळवारी महाल. गांधीबाग आणि सिव्हिल लाईन्स या भागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पुढील वर्षी साधारणपणे मार्च महिन्यापासून उन्हाळ्यात विजेची मागणी वाढू लागेल. अश्या वेळी या भागातील वीज ग्राहकांना अखण्डित वीज पुरवठा करणे आपले कर्तव्य आहे. येथील परिसरात असलेल्या वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण विहित कालावधीत करावे. यासाठी परिसरातील वीज यंत्रणेत आवश्यक आणि गरजेनुसार सुधारणा करण्याचे निर्देश उपस्थित अभियंत्यांना दिले.
वापरलेल्या प्रत्येक युनिटचा हिशोब लागला पाहिजे. वीज ग्राहकाला अचूक नोंदीचे देयक देऊन त्या रकमेची वसुली झाली पाहिजे. सोबतच वीज चोरीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावीत असेही यावेळी त्यांनी उपस्थितांना सांगितले. वीज ग्राहकांनी देयकाची रक्कम भरण्यासाठी जनजागृती कारण्यासासोबतच थकबाकीदार असलेल्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तात्काळ खंडित करा . सोबतच विभागवार वीज मीटर तपासणी मोहिम राबवून वीज चोरी शोधून काढा आणि त्यांच्यावर प्रचलीत वीज कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी उपस्थित शाखा अभियंत्यांना देण्यात आल्या.
या परिसरातील अनेक वीज ग्राहकांचे मोबाईल क्रमांक चुकीचे असल्याने त्यांच्यासोबत संपर्क साधण्यास अडचण होते ही बाब निदर्शनास आली असता चुकीचे क्रमांक नोंदवल्या गेले असतील तर ते दुरुस्त करून घ्या जेणेकरून महावितरणकडून वीज ग्राहकास एसएमएस पाठवयाचा असल्यास योग्य ठिकाणी पाठवणे सोयीचे जाईल. महावितरणकडून लवकरच या भागात या पद्धतीची मोहीम राबविल्या जाणार असून वीज ग्राहकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बैठीकीस नागपूर शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांच्यासह कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, राहुल जिवतोडे, समीर टेकाडे, सहायक महाव्यस्थापक (मानव संसाधन)वैभव थोरात, विभागातील सर्व अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते, सहायक अभियंते,माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि लेखा विभागातील अधिकारी उपस्थित होते.