लघुदाब ग्राहकांसाठी अत्याधुनिक स्वयंचलीत मीटर वाचन तंत्रज्ञान
नागपूर/प्रतिनिधी:
वीस किलोवॅटपेक्षा अधिक वीजभार असलेल्या औद्योगिक, वाणिज्यिक आणि घरगुती वर्गवारीतील महावितरणच्या लघुदाब वीज ग्राहकांच्या देयकांसंबंधीच्या तक्रारीँचे समुळ उच्चाटन करणे, ग्राहकांच्या वीजवापराच्या अचूक नोंदी घेऊन त्याचे योग्य देयक ग्राहकांना मिळावे, यासाठी महावितरणतर्फ़े नागपूर, चंद्रपूर आणि गोंदीया परिमंडलासह संपुर्ण राज्यात अत्याधुनिक स्वयंचलीत मीटर वाचन यंत्रणेने सज्ज असलेले मीटर बसविण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे.
मीटर वाचनात मानवी हस्तक्षेप संपुर्णपणे नाहीसा करुन मीटरवरील वीज वापराच्या नोंदीसह इतरही मापदंडांचे योग्य निरिक्षण पुर्णतः स्वयंचलीत पद्धतीने होऊन त्याचे अचूक विश्लेषण या स्वयंचलीत मीटर वाचन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या मीटरमुळे महावितरणला शक्य होणार असल्याने त्याचा लाभ वीजग्राहकांनाही होणार आहे. वीस किलोवॅटपेक्षा अधिक वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांकडे असलेली सीटी एम्बडेड मीटर बदलून त्याठिकाणी हे अत्याधुनिक मीटर बसविण्यात येणार आहे.
महावितरणच्या नागपूर, चंद्रपूर आणि गोंदीया परिमंडलासह राज्यभरातील सोळाही परिमंडलातून हे अत्याधुनिक मीटर बसविण्याची प्रक्रीया लवकरच सुरु होणार असून महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील सुमारे 6 हजार 860 घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांसह संपुर्ण राज्यात तब्बल 77 हजार ग्राहकांकडे हे मीटर बसविल्या जाणार आहेत.
यासंबंधीची आवश्यक ती प्रक्रीया महावितरणतर्फ़े पुर्ण करण्यात आली असून अत्याधुनिक मीटर पुरवठादार कंपन्यांना पात्र ग्राहकांची यादीही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संबंधित परिमंडलाच्या कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांची यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महावितरणला सर्वाधिक व हमखास महसुल मिळवून देणा-या उच्चदाब ग्राहकांसाठी स्वयंचलीत मीटर वाचन (एएमआर) तंत्रज्ञानाचा वापर यापुर्वीच सुरु करण्यात आला असून त्याव्दारे ग्राहकांच्या मीटरजवळ बसविलेल्या इंटरनेट मोडेमेच्या सहाय्याने थेट महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सर्वरमध्ये मीटर वाचनाच्या नोंदी दर महिन्याला नोंदविल्या जात आहेत.
या तंत्रज्ञानामुळे उच्चदाब ग्राहकांच्या मीटर वाचन आणि वीजदेयकासंबंधीच्या तक्रारी पुर्णपणे बंद झाल्या आहेत. आता हे तंत्रज्ञान वीस किलोवॅटपेक्षा अधिक वीजभार असलेल्या औद्योगिक, वाणिज्यिक आणि घरगुती वर्गवारीतील महावितरणच्या लघुदाब वीज ग्राहकांच्या मीटर वाचनासाठीही वापरल्या जाणार आहे.
मानवी हस्तक्षेप विरहीत स्वयंचलीत मीटर वाचनामुळे ग्राहकांना योग्य वीज वापराचे देयक मिळणार असून वीज ग्राहकांच्या हितासाठी महावितरणतर्फ़े सुरु करण्यात येणा-या या अत्याधुनिक मीटर बसविण्याच्या मोहीमेला ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी केले आहे.