नागपूर/प्रतिनिधी:
पावसाळयात विविधकारणामुळे वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार होतात, मात्र अशा प्रसंगी वीजपुरवठा त्वरीत सुरु करण्याच्या हेतूने ग्रामीण भागामध्ये गावातीलच अकुशल अशा खाजगी वायरमनव्दारे दुरूस्तीचा प्रयत्न होत असतो. अशावेळी किरकोळ दुर्घटनांसोबतच प्रसंगी कायमस्वरुपी अपंगत्व किंवा प्राणही गमवावे लागतात.
त्यामुळे खाजगी वायरमनचा हस्तक्षेप टाळून अपघात न होण्याच्या दृष्टीने वीजग्राहकांनी वीजयंत्रणेपासून सावध रहाण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
वादळी वारा आणि अतिवृष्टीमुळे वीज वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडने, वीजेच्या तारा तुटणे, लोंबकाळणे, इन्सुलेटर फुटणे अशा विविध कारणामुळे वीजपुरवठा खंडीत होत असतो. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रयत्नरत असतात. मात्र काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाल्याची सुचना वेळेवर न मिळणे किंवा यंत्रणेत बिघाड झाल्यास तो अवगत न होणे अशामुळे कर्मचारी त्या ठिकाणी पोहचण्यास उशीर होतो. अशावेळी स्थानिक एखादा खाजगी वायरमन वीजपुरवठा सुरु करण्याचा अनधिकृतपणे प्रयत्न करत असतो.
अपुरे ज्ञान अथवा निष्काळजीपणामुळे अपघाताच्या घटना घडतात. भारतीय विद्युत कायदा 2003 अन्वये असे कृत्य बेकायदेशीर असल्याचे जाहीरही करण्यात आले आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी वीजग्राहकांनी संबंधीत भागातील लाईनमन, कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधावा. एका प्लगमध्ये अनेक पिना टाकण्याची सवय असते ते टाळावे. त्याचबरोबर शक्य असल्यास घरामध्ये एमसीबी सर्किट बसवून घ्यावे, जेणे करुन शॉटसर्किट झाल्यास वीजपुरवठा आपोआप बंद होईल.
अशा प्रकारे किमान काळजी घेतल्यास आपण विजेपासून होणाऱ्या अपघातापासुन बचाव करु शकतो.
महावितरणचा कर्मचारीही कधी-कधी फाजील अतिविश्वासामुळे आपले प्राण गमावून बसतात. सुरक्षा साधनांचा वापर करतच खंडीत वीजपुरवठयाच्या तक्रारी सोडवाव्यात. मुख्यालयी राहून वीजग्राहकांना अखंडीत सेवा द्यावी. कर्मचा-यांच्या अथवा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अपघाताच्या घटना घडल्याचे सिध्द झाल्यास प्रशासकीय नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येइल असा इशारा कर्मचाऱ्यांना देत वीजग्राहकांनी संयम बाळगून महावितरणला सहकार्य करावे.
कोणत्याही प्रकारे अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी, वीज कर्मचा-यांनीही ग्राहकांशी सौजन्यपुर्ण वागावे, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, नेमका बिघाड काय आणि वीजपुरवठा सुरळित व्हायला संभाव्य कालावधीची माहिती ग्राहकाला देण्याच्या सुचना महावितरण प्रशासनाकडून कर्मचा-यांना देण्यात आल्या आहेत. वीज दिसत नसली तरी तीचे परिणाम मात्र जीवघेणे असतात. एक छोटीसी चुकही अखेरची ठरु शकत असल्याने विजेपासून सतर्कता बाळगण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
आला पावसाळा, विजेचे धोके टाळा!
· आकाशातील विजेचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी.
· आपल्या घरात ELCB Switch (Earth Leakage Circuit Breaker) असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊन जिवितहानी टाळता येईल.
· अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी परवानाधारक व्यक्तीकडूनच करावी.
· जमिनीवर पडलेल्या वीजतारांना स्पर्श करू नये आणि तुटलेल्या, लोंबकळणार्या वीजतारांपासून सावध राहावे, तातडीने वीज कंपनीला त्याची माहिती द्यावी.
· पावसापासून बचाव करताना आजूबाजूला जिवंत विद्युततारा धोकादायक स्थितीत नसल्याची खात्री करून घ्यावी. त्यास हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करु नये.
· कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा. कारण अनावधानाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते.
· घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अँण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. विद्युत उपकरणे दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा.
· विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विशेषत: मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे, वीज पुरव्ठादार कंपनीला सांगून मीटरची जागा बदलून घ्यावी.
· घरातील कोळी, किटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्वीच बोर्डचा आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते. त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी.
· पावसाळयात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये. तसेच ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. अशी उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर असावीत.
· वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून, किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.
· वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.
· विद्युत खांबाला व ताणाला (stay) जनावरे बांधू नयेत.
· विद्युत खांबाच्या खाली गोठे किंवा कडब्याची गंजी उभारु नये.
· वीजपुरवठा खंडित झाल्यास 15 ते 20 मिनिटे थांबूनच वीज कंपनीला 18002333435 किंवा 18001023435 किंवा 1912 या 24 तास टोल फ़्री क्रमांकावर संपर्क करावा. अतीवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे.
· बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा, जेणेकरुन तातडीने दुरूस्ती करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यास मदत होईल.
· घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होऊन संभाव्य अपघात टाळता येतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही आणि प्राणांकीत अपघाताची दाट शक्यता असते.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
प्रादेशिक कार्यालय, महावितरण, नागपूर
योगेश नरहरी विटणकर,
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महाराष्ट राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत
(महावितरण)
प्रादेशिक कार्यालय, नागपूर
भ्रमणध्वनी क्रमांक - ७८७५७६१०३२