चांपा/प्रतिनिधी:
चांपा-सुकळी रस्त्यांवर लाखो रुपये खर्च करून पाचमहिन्यांपूर्वीच नूतनीकरण केलेल्या चांपा -सुकळी ते वडद रस्त्यांवर अवैधरीत्या सुरू असलेल्या मुरूम उत्खननाच्या जड वाहतुकीमुळे पहिल्याच पावसाळ्यात खड्डेच खड्डे पडले आहेत .यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशासह विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थदेखील वैतागले आहेत .चांपा सुकळी पेंढरी चिमणाझरी, वडदला जाणारा हा रस्ता असून विद्यार्थी व ग्रामस्थ या मार्गाने जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात .गेली अनेक वर्ष खड्डे पार करीत जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर तरी सुखाचा प्रवास करता येईल अशी आशा होती .
परंतु लाखो रुपये खर्च करून दुरुस्त केलेला हा रस्ता पहिल्याच पावसात जड वाहतुकीने उखडल्यामुळे हा पैसा पाण्यात गेल्याची लोकांची भावना झाली आहेत .चांपा सुकळी वडदला जाणारी ही वाट पुन्हां बिकट बनली असल्याचे चित्र दिसत आहे .चांपा सुकळी रस्त्यांसाठी चांपा येथील दैनिक सकाळचे बातमीदार अनिल पवार यांनी या रस्त्याचा प्रश्न धरून लावला होता .वेळोवेळी रस्त्यांसाठी दै .सकाळ ने वृत प्रकाशित केल्यामुळे या रस्त्याचे नुतनीकरण करण्यात आले .चांपा ते सुकळी रस्ता खराब असल्याने वेळेवर दवाखान्यात नेता आले नाही .
त्यामुळे उपचाराअभावी एका वृध्दाला जीव गमवावा लागल्याची घटना सुकळी येथे घडली .विशेष म्हणजे तालुक्यातील रस्त्याच्या स्थितीवर सकाळ ने सहा ऑक्टोंबर रोजी बातमीतुन प्रकाश टाकला होता .केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या दत्तक घेतलेल्या पाचगाव या गावापासून अवघ्या १५किलोमीटर अंतरावरील सुकळी या गावातील चंद्रभान मडावी यांना जीव गमवावा लागला .या रस्त्यांवर शाळकरी मुलांची होणारी गैरसोय अनेकांनी बघितली .
या मार्गावर सतत सुरूच असलेली अवैधरीत्या मुरूम वाहतुकीमुळे हा रस्ताखराब झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे .रस्ते बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन तत्काळ चांपा सुकळी मार्गाची दुरुस्ती करून अवैधरीत्या मुरूम वाहतुकीवर कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली .