नागरिकांना त्रास झाल्यास गंभीर कारवाही
करणार: डॉ. कुणाल खेमनार
चंद्रपूर/प्रतिनिधी:
वरोरा चिमूर उमरेड राष्ट्रीय महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोली या विभागाकडून संथगतीने सुरू असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अहवालावरून या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून जीवित हानी सुद्धा झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित विभाग तसेच कन्ट्रक्शन कंपनी यांना सात दिवसात महामार्गाची सुधारणा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभाग, गडचिरोली यांचेकडून वरोरा चिमूर महामार्गाचे बांधकाम निष्काळजीपणाने आणि बेजबाबदारपणामुळे सुरू असून महामार्गावरील धुळीमुळे शेतजमीन प्रभावित होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच वाहतुकीत अडचणी निर्माण होत असून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अहवालानुसार 2018-19 या एक वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण एकोणीस अपघात झाले असून दहा व्यक्तींना गंभीर दुखापत आणि दोन व्यक्तींना किरकोळ दुखापत तसेच सात व्यक्तींना नाहक जीव गमवावा लागला आहे. जनतेस होत असलेल्या त्रासाच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये वेळोवेळी प्रकाशित झाल्या आहे. यामुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पत्रात नमूद आहे.
या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गंभीर दखल घेतली असून येत्या सात दिवसात या संपूर्ण समस्येवर तोडगा काढून महामार्गाची सुधारणा करण्यात यावी. दिलेल्या मुदतीत सार्वजनिक उपद्रव दूर न झाल्यास 21 ऑगस्ट 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतः लेखी खुलाशासह उपस्थित रहावे, असे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभाग, गडचिरोली व राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, चंद्रपूर यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
चंद्रपूर शहरातील सावरकर चौक ते
एम. ई. एल. रस्त्यासंदर्भातही सूचना
तसेच चंद्रपूर शहरातील सावरकर चौक ते एम.ई.एल या रस्त्याचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोली यांच्यामार्फतिने सुरू आहे. या रस्त्याचे बांधकाम करत असताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊनही या दृष्टिकोनातून सदर मार्गावरील बंद असलेले पथदिवे तात्काळ सुरू करावे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे मुरूम माती टाकून तात्काळ बुजवण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहे.