Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट ०२, २०१९

सरकारच्या मुस्कटदाबीमुळे प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात:पुण्यप्रसून वाजपेयी

ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांची टीका 
चंद्रपूर/प्रतिनिधी:

 गेल्या काही वर्षांत देशातील परिस्थिती बदलली आहे. जी प्रसारमाध्यमे सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करायची, तीच माध्यमे आता सरकारच्या हातची बाहुले बनली आहे. सरकारने प्रसार माध्यमांची मुस्कुटदाबी केली आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र धोक्यात आले आल्याची टीका करीत माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी पत्रकारांनी सजग होणे आवश्यक असल्याचे आवाहनही ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांनी माध्यमातील प्रतिनिधींना केले. 


चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. 


चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ आणिचंद्रपूर श्रमिक पत्रकार ट्रस्टच्या वतीने दरवर्षी कर्मवीर पुरस्कारासह विविध स्पर्धा पुरस्काराचे वितरण केले जाते. गुरुवारी मध्यवर्ती बॅंकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार होते. यावेळी विचारपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम, सचिव प्रशांत विघ्नेश्वर, कर्मवीर पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख, दिवंगत सूर्यकांत जैन यांच्या पत्नी श्रीमती कल्पना जैन आदींची उपस्थिती होती. 


पुढे बोलताना वाजपेयी म्हणाले, केंद्रातील आजचे सरकार हे केवळ सीबीआय, इन्कम टॅक्स, इडीच्या अधिकाऱ्यांची भूमिका पार पाडत आहे. सरकारचे गुणगाण करणाऱ्यांना गोंजारण्याचे तर विरोधात बोलणाऱ्यांना इडी, इन्कम टॅक्सची भीती दाखविली जात आहे. सरकारसोबत नाही, याचा अर्थ तुम्ही सरकारच्या विरोधात आहात असाच अर्थ काढला जात असून, विरोधात असणाऱ्यांना मानसिक त्रास देण्याचे काम सरकारकडून केला जात असल्याचा आरोप पुण्यप्रसून वाजपेयी यांनी केला आहे. वृत्तवाहिण्यांनी काय दाखवावे, कोणत्या बातम्या दाखवाव्या, कोणत्या विषयांवर चर्चा करावी हे सरकार ठरवू लागले आहे. एकंदरीत संपूर्ण माध्यमांवर सरकारी नियंत्रण आले आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशी अवस्था निर्माण झाल्याचे वाजपेयी यांनी सांगितले. 

आता तर सरकारच्या विरोधात एकही बातमी प्रसारीत होणार नाही अशी व्यवस्था सरकारने निर्माण केली असून, सरकारच्या विरोधात माहिती प्रसार माध्यमांना देणाऱ्या अधिकाऱ्यांना नारळ दिला जात आहे. मात्र, ही व्यवस्था बदलावी लागेल, यासाठी पत्रकारांनी सजग राहून पत्रकारिता करावी, सरकारच्या चुकीच्या धोरणांवर लिहिण्याचे, बोलण्याचे धाडस कायम ठेवावे, असे आवाहनही त्यांनी पत्रकारांना केले. 


कार्यक्रमात स्पर्धा पुरस्काराचे परीक्षक जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, प्रा. टी. डी. कोसे, स्पर्धा प्रायोजक ऍड. प्रशांत खजांची, डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, अशोकसिंग ठाकूर यांचा वाजपेयींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्तविक संजय तुमराम तर संचालन आशिष अंबाडे यांनी केले. आभार प्रशांत विघ्नेश्वर यांनी मानले. यशस्वीतेसाठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी सहकार्य केले. 
विनोद देशमुख, दिवंगत जैन यांना कर्मवीर पुरस्कार 

श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांसाठी दिला जाणार कर्मवीर पुरस्कार विनोद देशमुख यांना प्रदान करण्यात आला. दिवंगत सूर्यकांत जैन हे कर्मवीर पुरस्काराचे दुसरे मानकरी होते. त्यांच्या मरणोत्तर त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला. रोख राशी, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. 

स्पर्धा पुरस्कारांच्या विजेत्यां पत्रकारांचा सन्मान 
पत्रकार संघाच्या वतीने ग्रामीण आणि शहरी पत्रकारांना लिहण्याचे बळ आणि प्रेरणा मिळावी यासाठी विविध पुरस्कार स्पर्धा आयोजित केले जातात. यावर्षीचा ग्रामीण विकासवार्ताचा प्रथम पुरस्कार प्रा. धनराज खानोरकर, द्वितीय पुरस्कार अमर बुद्धारपवार, तृतीय पुरस्कार डॉ. प्रशांत खुळे तर प्रोत्साहन पुरस्कार आशिष गजभिये, पंकज मिश्रा यांना प्रदान करण्यात आला. शुभवार्ता पुरस्कार सुरेश वर्मा, मानवी स्वारस्य अभिरूची कथा पुरस्कार नीलेश झाडे आणि संदीप रायपुरे यांना संयुक्त पणे, इलेक्ट्रानिक मीडियासाठीचा उत्कृष्ट वृत्तकथा पुरस्कार अन्वर शेख, उत्कृष्ट वृत्तछायाचित्र पुरस्कार सचिन वाकडे यांना पुण्यप्रसून वाजपेयी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख बक्षीस, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.