Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जुलै ०२, २०१९

पावसाळय़ात विज उपकरणांपासून सावधानता बाळगा

महावितरणचे आवाहन

नागपूर/प्रतिनिधी:



पावसाळयात वादळीवारा व अतिवृष्टीमुळे वीजखांब पडल्याने तारा तुटून किंवा शॉर्टसर्किटने दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक ठिकाणी किंवा घरगुती वीज यंत्रणा, उपकरणापासून सावधानगीरी बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.


पावसाळयात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही. याची खबरदारी घ्यावी. घरातील वीज पुरवठय़ाला आवश्यक आर्थिग केल्याची खात्री करून घ्यावी. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. विशेषत: टिनाच्या घरात राहणार्‍या नागरिकांनी पावसाळयात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विजेच्या खांबाना, ताण ताराला जनावरे बांधू नयेत. त्यास दुचाकी टेकवून ठेवू नये किंवा खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. घरावरील डिश किंवा ॲन्टीना वीज तारांपासून दूर ठेवावेत. ओल्या कपड्यावर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही याची दक्षता घ्यावी.


मुसळदार पाउस आणि वादळीवारा यामुळे झाडांच्या मोठय़ा फांद्या तुटून वीज तारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीज खांब वाकतात. त्यामुळे तारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीज प्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या तारापासून सावध रहावे. त्यांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्नकरू नये. याशिवाय अतिवृष्टी किंवा वादळाने तुटलेल्या वीज तारा, खांब रस्त्यांच्या बाजुचे फिडर पिलर, ट्रान्सफॉर्मरचे लोखंडी कुंपण, फ्युजबॉक्स तसेच घरातील ओलसर उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड याकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता असते. थोडी दक्षता बाळगल्यास या अप्रिय दुर्घटना टाळणे सहज शक्य असते. 


शहर व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी २४ तास सुरू असलेल्या महावितरणच्या कॉलसेंटर्स १९१२, १८00२३३३४३५ किंवा १८00१0२३४३५ या टोलफ्री क्रमांकावर उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लँडलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोल फ्री क्रमांकावर वीज ग्राहकांना तक्रार दाखल करता येते. वीज सेवेच्या तक्रारीसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठय़ात तांत्रिक बिघाड होवून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणची माहिती या टोलफ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. टोलफ्री कॉल सेंटरमध्ये वीज ग्राहकांनी रजिस्टर्ड केलेल्या कोणत्याही लँडलाईन किंवा मोबाईल क्रमांकावरून तक्रार केल्यास फक्त तक्रारीचा तपशिल सांगावा लागणार आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

वीजपुरवठा जाण्याची आणखी बरीच कारणे आहेत. ही कारणे शोधण्यापेक्षा वीज गेल्यास काय करावे अन् काय करु नये याची व पावसाळ्यात विजेबाबत घ्यावयाची काळजी याबद्दलची माहिती आपण थोडक्यात घेऊ या.


 आपल्या घरात ELCB Switch (Earth Leakage Circuit Breaker) असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊन जिवितहानी टाळता येईल.

    अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी करावी.

     वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून, किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.


  वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.


  विद्युत खांबाला व ताणाला (stay) जनावरे बांधू नयेत.


   विद्युत खांबाच्या खाली गोठे किंवा कडब्याची गंजी उभारु नये.


  वीजपुरवठा खंडित झाल्यास 15 ते 20 मिनिटे थांबूनच वीज कंपनीला 1912, 18002333435 किंवा 18001023435 या 24 तास टोल फ़्री क्रमांकावर संपर्क करावा.


  बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा, जेणेकरुन तातडीने दुरूस्ती करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यास मदत होईल.


  विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये व तातडीने वीज कंपनीला त्याची माहिती द्यावी.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.