चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा कर्मवीर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख आणि स्व. सूर्यकांत जैन यांना जाहीर झाला आहे. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने नुकतीच या पुरस्काराची घोषणा केली आहे.
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकाराचा कर्मवीर पुरस्कार देऊन दरवर्षी गौरव केला जातो. यावर्षी या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक, संपादक विनोद देशमुख यांच्यासह श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य सूर्यकांत जैन यांची निवड करण्यात आली आहे.
सूर्यकांत जैन यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. विनोद देशमुख गेली ४० वर्ष पत्रकारितेत विविध पदावर काम करीत असून, विविध विषयांवर लेखन केले आहे. प्रारंभीच्या काळात साप्ताहिक ते राजुरा समाचार चे कार्यकारी संपादक होते.
यानंतर दैनिक तरुण भारत आणि लोकमतचे राजुरा तालुका प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नागपूर पत्रिकेत त्यांनी काही काळ कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली. विविध प्रादेशिक दैनिकात त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. सध्या ते मुक्त पत्रकार रुपात सक्रिय आहेत.
त्यांचे देशमुखी, राजेहो, दुसरी बाजू, वऱ्हाडी झटका, शरसंधान, झगमग आदी स्तंभ गाजले आहेत. २००१ मध्ये ते नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. कर्मवीर पुरस्काराचे दुसरे मानकरी सूर्यकांत जैन हे चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य आणि माजी अध्यक्ष आहेत.
काही काळ त्यांनी चांदाफोर्ट नावाचे साप्ताहिक चालविले. यानंतर दैनिक महासागरचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केले. याच वृत्तपत्रात ते काही वर्ष ते निवासी संपादक होते. काही वर्षांपूर्वीच त्यांनी स्वत:चे 'चर्चित खबर' नावाचे साप्ताहिक काढले होते. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.