नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या सांघिक कार्यालयात मुख्य अभियंता (चाचणी) म्हणून कार्यरत असलेले मनिष गणेशराव वाठ यांना नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रोद्योगिकी संस्था (व्हीएनआयटी) ने त्यांच्या "एरर कम्पेन्सेशन टेक्निक फ़ॉर स्मार्ट इंडस्ट्रीयल मीटरींग सिस्टिम" विषयावरील शोधप्रबंधासाठी अभियांत्रिकी शाखेतील आचार्य पदवी बहाल केली आहे.
मनिष वाठ यांनी कराड येथील शासकीय अभियांत्री महाविद्यालयातून बीई व त्यानंतर नागपूर येथील तत्कालीन व्हीआरसीई (आताच्या व्हीएनआयटी) येथून इंटिग्रेटेड पॉवर सिस्टीम या विषयात एम टेक पूर्ण केले. 1994 साली तत्कालीन मराविमं मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून आपली कारकिर्द सुरु केलेल्या मनिष वाठ यांनी महावितरणच्या नागपूर चाचणी विभागात कार्यकारी अभियंतापदी कार्यरत असतांना चाचणी विभागाच्या सुधारणेवर विशेष भर दिला. नागपूर येथे वीज मिटर चाचणी प्रयोगशाळा विकसित करुन आणि त्यास राष्ट्रीय मान्यताप्राप्त बोर्ड ऑफ लेबोरेटरीज (एनएबीएल), दिल्लीकडून मान्यता मिळवून देण्यात त्यांचा विशेष वाटा आहे. राष्ट्रीय अधिस्विकृती मिळविणारी नागपूर येथील महावितरणची ही राज्यातील पहिलीच प्रयोगशाळा आहे. या चाचणी प्रयोगशाळेच्या विकासातील योगदानासाठी त्यांना राजीव गांधी सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंतापदी पदोन्नतीवर तर सध्या महावितरणच्या सांघिक कार्यालयात मुख्य अभियंता (चाचणी) म्हणून ते कार्यरत आहेत.
प्राध्यापक डॉ. मकरंद एस. बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाबद्दल मनिष वाठ यांनी कृतज्ञता व्यक्त केली असून पत्नी सौ. शिल्पा वाठ आणि पालकांच्या निरंतर प्रेरणेमुळेच आपल्याला हे यश संपादीत करता आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या यशाबद्दल महावितरणचे व्यवस्थापन, कर्मचारी, सहकारी, कुटुंब आणि मित्रांनी केलेल्या सहकार्यासाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले आहे.