Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जुलै २४, २०१९

ग्राहकांना उत्कृष्ट सेवादेण्यासाठी अभियंत्यांनी दौरे करावे:ऊर्जामंत्री बावनकुळे

महावितरणची आढावा बैठक
अभियंत्यांनी कार्यक्षमता वाढवावी 
ग्राहकांसोबत सौहार्दपूर्ण वागणूक ठेवा
माहिती तंत्रज्ञानाचा वापर ग्राहक सेवेसाठी करा 
दुर्लक्षामुळे कुणाचाही जीव जाऊ देऊ नका
नागपूर/प्रतिनिधी:

वीज ग्राहकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारयांनी दौरे केल्यास ९० टक्के प्रश्न सुटतील. ग्राहकसेवा उत्कृष्ट करण्याच्या दृष्टिने काम करा. थोडी कार्यक्षमता वाढवली तर तांत्रिक समस्याही सुटतील, असे आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.

वाशी येथील एनएमएसए सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील उपस्थित होते. कोकण विभागात कल्याण, भांडुप, नाशिक, जळगाव व रत्नागिरी पीरमंडलाचा समावेश असून या परिमंडलात सुरू असलेले प्रकल्प, वीजहानी, ग्राहकांच्या तक्रारी व त्यावरील उपाययोजना, अधिकारी व कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. आपल्या भावपूर्ण मार्गदर्शनात ऊर्जामंत्री म्हणाले, गेल्या चार वर्षात ऊर्जा विभागात अनेक नवीन प्रकल्प आणले, सुधारणा झाल्या, नवीन माहिती तंत्रज्ञान महावितरणने स्वीकारले. त्याचा फायदा वीज ग्राहकांना झाला पाहीजे. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार व त्यांच्या टिमने उत्कृष्ट कार्य करुन महावितरणच्या कामाची दखल केंद्र शासनाला घेण्यास भाग पाडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणचा गौरव केला आहे.

जनतेला २४ तास अखंडित वीज मिळाली पाहीजे यासाठी आपण बांधिल आहोत. जाणिवपूर्वक चुका करु नका. जाणीवपुर्वक केलेल्या चुका माफ होणार नाहीत. तसेच आपल्या दुर्लक्षामुळे कुणाचा जीव जाणार नाहीं, याची खबरदारी घ्या. अन्यथा महावितरण व सरकार बदनाम होते. कारवाई करणे सोपे आहे पण कारवाईची गरज पडू नये याची दक्षता बाळगा. आगामी काळात वीजेची मागणी 35 हजार मेगावॅटपर्यंत पोहचणार आहे.

 त्यादृष्टीने वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणा उभ्या करायच्या आहेत. याची जाणीव ठेऊन कर्मचारी-अधिकाऱ्यांनी काम करावे. ग्राहकांना वीज पुरवठा करताना आणि त्यांच्या समस्या सोडविताना सभ्यतेची वर्तणूक ठेवा. मोबाईलवर ग्राहकांशी बोलताना सौजन्याने बोला, याकडेही उर्जामंत्रांनी लक्ष वेधले. शासनाकडे वीज उपलब्ध आहे. तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडित झाला तर समजून घेता येईल पण वीज उपलब्ध असताना कोणीही प्रकाशापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या नकारात्मक मानसिकतेतून बाहेर या, अशा सूचना उर्जमंत्र्यांनी दिल्या. 

आढावा बैठकीच्या सुरवातीलाच व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी पाचही परिमंडळातील वीजहानी, ग्राहकांच्या समस्या, अपूर्ण कामे, महावितरणच्या विविध योजना, ग्राहक सेवा या विषयांचा आढावा घेतला. महावितरणने ज्या सेवा ऑनलाइन केल्या त्याचा फायदा ग्राहकांना द्या. विनाकारण खेटे घालायला लावू नका. ज्या फिडरवर वारंवार वीजपुरवठा खंडित होत असेल आणि वितरण हानी अधिक असेल त्यासाठी अभियंता, सहायक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना जबाबदार ठरविण्यात येणार आहे, असा इशारा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी यावेळी दिला.

महावितरणची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना आता कामे तसेच कामांचे देयकही ऑनलाईन देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या वापर करताना ग्राहकाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना संचालक दिनेशचंद्र साबू दिल्या. संचालक प्रकल्प भालचंद्र खंडाईत यांनी महावितरणकडून सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला. या बैठकीला मुख्य अभियंत्यांसह सुमारे 130 अभियंते व अधिकारी उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.