Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून ०९, २०१९

मन प्रसन्न ठेवण्याकरिता "तुमचं बरोबर आहे" म्हणायला शिका:डॉ.संजय उपाध्ये

निरोगी व विनोदी पुरुष समृद्ध घराचे लक्षण

चिडू नका, संयम ठेवा,वर्तमानात जगा

जन्म-मृत्यू मधील प्रवास आनंदी घालवा

नागपूर/प्रतिनिधी:

नासारखी बायको मिळाली नाही, सासर मिळाले नाही, मनासारखे आई-वडील-भाऊ-बहिण मिळणे हे जसे आपल्या हाती नसते तसेच ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याबाबत चिंता, कटकट, चिडचिड केल्यास मन अप्रसन्न राहते. जास्त पैसा देखील अप्रसन्न करतो. दुसऱ्या कडच्या वस्तू विषयी आकस ठेवू नका. जिथे उणीव असते नेमके त्याचठिकाणी जाण्याचा मानवी स्वभाव आहे.नोकरी लागतानाचा आनंद नंतर राहत नाही त्यामुळे आता जिज्ञासा आणि हास्य कमी होत चालले आहे.

मराठी माणूस मनमोकळेपणाने व्यक्त होत नाही. अंड ज्याप्रमाणे आतून फुटले कि, जीव जन्मास येते त्याचप्रमाणे मन प्रसन्न ठेवण्याकरिता जीवनाचा आतून आनंद घेता आला पाहिजे व "तुमचं बरोबर आहे"हे सांगता आले पाहिजे. 

निरोगी आणि विनोदी पुरुष हे समृद्ध घराचे लक्षण आहे तर मन प्रसन्न ठेवण्यासाठी मनन, नमन, वमन असे तीन प्रभावी पर्याय डॉ.संजय उपाध्ये यांनी सांगितले. 

महानिर्मितीच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशगड मुख्यालय मुंबई येथे आयोजित मन करा रे प्रसन्न या कार्यक्रमात ते बोलत होते. 

शहरातील अरुंद रस्ते,बेशिस्त वाहतूक व्यवस्था, वर्तमानपत्रातील नकारात्मकता, मृत्यूचे प्रकार, बँकेतील निरव शांतता इत्यादी ज्वलंत मुद्द्यांना त्यांनी हळुवार स्पर्श केला. लग्न पत्रिकेतील गमतीजमती, घरातील प्रसंग जसे उंबरठ्याचे महत्व, आजोबा-नातू संवाद, सासू-सून, नवरा-बायको यांच्या गमतीदार प्रसंगातून घरातील वातावरण चांगले ठेवण्याचा त्यांनी सल्ला दिला. 

परिस्थितीनुसार प्रतिसाद द्या, प्रतिक्रिया देऊ नका, हे ज्याला समजलं तो जिंकला. रोज सकाळी उठल्यावर स्वत:ला आरशात पहा, आरसा पाणी आहे त्यामुळे स्वतःला पाण्यात पहा. ज्याप्रमाणे एकाच विनोदावर आपण वारंवार हसत नाही त्याचप्रमाणे एकाच दु:खावर वारंवार रडू नका, दु:ख गाळून घ्या, उगाळून घेऊ नका. झालं गेलं विसरून जा, स्वत:वर हसण्यातच खरी गंमत आहे व त्यातूनच मन प्रसन्न ठेवता येते. 

श्रीमंतीचा दर्प, प्रदर्शन, जातं-आई-वडील, खुंटी-अभ्यासक्रम, फिरवतात-शिक्षक, विद्यार्थी-धान्य तर बाहेर पडतं ते विद्यापीठ अशी त्यांनी शाब्दिक कोटी केली.

अंगावर कमी होत असलेले कपडे व डार्विनचा सिद्धांत, मराठीतील स्वर्गीय, कैलासवासी तर इंग्रजीतील लेट, आय सी. यु. कम आई अशी कमाई, विद्यार्थी दशा,श्लेष अलंकारातील गमती-जमती असे  एकाहून सरस एक दर्जेदार गोष्टींतून उपस्थितांची वाहवा मिळविली व  मने प्रसन्न केली. 

कौतुक करण्याने माणूस मोठा होतो.आनंदी देशाच्या यादीत भारताचा १३५ वा क्रमांक आहे.प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा,विचारात लवचिकता ठेवा,कायम विद्यार्थी राहून शिकण्याची उर्मी ठेवा आणि उगवणारा प्रत्येक दिवस ,क्षण परत येणार नसल्याने समाधानी आनंदी जगा. 

डॉ.संजय उपाध्ये यांचे  सुमधुर शब्द, ओघवती शैली, उत्तम सादरीकरण, गमतीजमती, विनोदी संधीविग्रहाला रसिकांनी भरभरून दाद दिली. सलग दोन तासात प्रति मिनिट एक याप्रमाणे १२० हास्य त्यांनी निर्माण केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार सोनाली चुंगडे यांनी मानले.  

कार्यक्रमाला महानिर्मितीचे संचालक(वित्त)संतोष अंबेरकर, कार्यकारी संचालक विनोद बोन्द्रे, राजू बुरडे, सतीश चवरे,संजय मारुडकर, श्यामसुंदर सोनी,प्रभाकर निखारे, मुख्य अभियंते नवनाथ शिंदे, आनंद कोंत, अनिल मुसळे, महानिर्मिती-महावितरणचे प्रकाशगड,धारावी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी,विभाग प्रमुख तसेच बोरिवली वसाहतीतील पुरुष-महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्धापन दिन आयोजन समिती सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.   


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.