नाग नदीच्या प्रदूषणामुळे वैनगंगा नदीकाठावरील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
पवनी/प्रतिनिधी:नागपुरातील नाग नदीच्या प्रदूषणामुळे वैनगंगा नदीवरील प्रसिद्ध गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झालेले आहे. हे प्रदूषित पाणी पवनी शहर, भंडारा शहर व वैनगंगा नदी काठावरील नागरिकांना नाईलाजाने प्यावे लागत आहे.परिणामी भंडारा व पवनी तालुक्यात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवाशक्ती संघटना, तालुका -पवनी चे कार्यकर्ते वैनगंगा नदी पात्रात स्वतःला अर्धे गाडून अर्ध दफन आंदोलन दिनांक 19 जुन 2019 रोज बुधवार ला दुपारी 3.30 वाजता करणार आहेत.
नागपुर शहरातून वाहणाऱ्या नागनदी मध्ये नागपूर शहरातील मलमूत्रयुक्त 420 द.ल.लि. पाणी दररोज सोडले जाते.ही नागनदी आंभोरा येथे अन्य चार नद्यासह वैनगंगा नदीला येऊन मिळते. आणि ते सर्व प्रदूषित नाग नदीचे पाणी वैनगंगा नदी प्रवाहात वाहत जाऊन गोसिखुर्द धरणात जमा होते. वैनगंगा नदी काठावरील नागरिक हे प्रदूषित पाणी पितात.या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांना कावीळ,गॅस्टो,विषमज्वर आदी रोगांची लागण होत आहे.वैनगंगा नदी काठाजवळ डासांची मोठ्या प्रमाणात या प्रदूषित पाण्यामुळे निर्मिती झालेली आहे.त्यामुळे मलेरिया, विषाणूजन्य ताप,डेंग्यू सदृश्य ताप आदींचा येथील जनतेला नेहमी सामना करावा लागत आहे.
या गंभीर आरोग्यविषयक समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि नाग नदीवर जलशुद्धीकरण सयंत्र बसवावे या मागणी साठी युवाशक्ती संघटना तालुका -पवनी चे कार्यकर्ते पवनी येथील वैनगंगा पुला खाली स्वतःला गाडून अर्ध दफन आंदोलन करणार आहेत.तरी या सर्व सामान्य लोकांच्या मागणी साठी असलेल्या आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे अशी विनंती केलेली आहे.