नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर जिल्ह्यातील एकमेव कांग्रेसचे आमदार सुनील केदार आणि चंद्रपूर लोकसभा जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना कॉंग्रेसने प्रमोशन दिले आहे.विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वडेट्टीवार यांची नियुक्ती केल्याचे पत्र लोकसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी जारी केले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना ऐनवेळी कॉंग्रेसमध्ये आणले होते.
त्यांना सहजपणे लोकसभेची उमेदवारी मिळेल असे वाटत असताना दुसरेच नाव घोषित केल्याने कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. वडेट्टीवार यांनी आपले वजन पणाला लावून शेवटी धानोरकर यांना उमेदवारी मिळवून दिली. संपूर्ण महाराष्ट्रातून कॉंग्रेसचे जिंकून आलेले धानोरकर एकमेव उमेदवार आहेत. त्यांनी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर यांना पराभूत केले.त्यामुळे महाराष्ट्रात विजय वडेट्टीवार यांनी कॉंग्रेसची लाज राखली,त्याचे बक्षीस म्हणून व आक्रमक अनुभवी नेते म्हणून विरोधीपक्ष नेतेपद दिल्याने विधानसभेत काँग्रेसच्या सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीत राज्यातून एकमेव जागेवर विजय मिळवून देत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होण्याची नामुष्की टाळणारे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांना अपेक्षेप्रमाणे बक्षीस मिळाले आहे.
येत्या सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. विधिमंडळाच्या कामाकाजासाठी काँग्रेसने नवीन टीमची घोषणा केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी राज्यातील फेरबदलाचे आदेश शुक्रवारी सकाळी जारी केले. दोन्ही सभागृहाच्या नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासह सर्व पदांचा राजीनामा देणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला राजीनामा दिल्यापासून काँग्रेसमध्ये फेरबदल अपेक्षित होते. सभागृहातील उपनेते असल्याने विजय वडेट्टीवार नेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यानुसार पक्षाने त्यांना गटनेता केले.
काँग्रेसने विदर्भाला बऱ्यापैकी झुकते माप दिले आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित असून एकेकाळी गड असलेला विदर्भ अधिक भक्कम व्हावा, असे प्रयत्न यातून करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील एकमेव आमदार सुनील केदार आणि तिवसाच्या यशोमती ठाकूर यांची प्रतोदपदी नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. वडेट्टीवार व केदार यांनी यापूर्वी राज्यमंत्रिपद भूषवले. चव्हाण विरोधी गटात केदार यांचा समावेश असल्याची पक्ष वर्तुळात चर्चा आहे. यशोमती ठाकूर राष्ट्रीय सचिव आहेत.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध संपर्क :९१७५९३७९२५ |
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध संपर्क :९१७५९३७९२५ |