चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते उदघाटन
देश-विदेशातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन
पर्यावरण क्षेत्रातील मनुष्यबळासाठी पर्वणी
नागपूर/प्रतिनिधी:
महानिर्मितीच्या विद्यमाने “औष्णिक ऊर्जा : रसायनशास्त्र आणि शाश्वत पर्यावरण-२०१९” या विषयावर तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन बुधवार ५ जून २०१९ रोजी नागपुरातील हॉटेल तुली इम्पेरीयल, रामदास पेठ, येथे करण्यात येत आहे.
पर्यावरण क्षेत्राशी निगडीत असलेले ज्वलंत विषय, जनजागृती व जाणीवा निर्माण करण्यासाठी पर्यावरण, विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ, रसायनशास्त्रज्ञ अधिकारी-अभियंते तसेच या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी मंच उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धती जाणून घेणे व सुसंवाद निर्माण करून समस्यांचे निरसन करणे हे परिषद आयोजनामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यंदा, या एक दिवसीय परिषदेचे यजमानपद चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र यांचेकडे आहे. बुधवार ५ जून रोजी सकाळी १० वाजता या परिषदेचे उदघाटन नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे शुभहस्ते होणार असून महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग हे प्रमुख अतिथी तर विशेष अतिथी म्हणून संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(प्रकल्प) वि.थंगपांडियन, कार्यकारी संचालक राजू बुरडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेत, पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत त्यात देबी गोयंका, अरुण कृष्णमूर्ती, डॉ. विलास सपकाळ, डॉ. श्रीपाल सिंग, डॉ. साधना रायलू, डॉ. संजय ढोबळे, डॉ. नीरज खटी, डॉ.बागची, डॉ.आर.आर.खापेकर, डॉ.संजय दानव, डॉ.अश्विनी दानव-बोधाने यांचा प्रामुख्याने समावेश आहे. महानिर्मिती, निरी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागपूर विद्यापीठ व पर्यावरण क्षेत्रातील सामाजिक संस्थांचे अधिकारी-अभियंते/प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
चंद्रपूर वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे, मुख्य महाव्यवस्थापक(पर्यावरण व सुरक्षितता) डॉ.नितीन वाघ व चंद्रपूर वीज केंद्राचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते ह्या परिषदेच्या यशस्वितेसाठी प्रयत्नशील आहेत.