Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून ०४, २०१९

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत झोननिहाय पाणीपुरवठा आढावा सभा संपन्न

चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपूर शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या उज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला पाणीपुरवठा अनियमिततेसाठी करार रद्द करण्याचा प्रस्ताव पुढील मनपाच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे निर्देश आयुक्त श्री. संजय काकडे यांनी मंगळवारी ४ जून रोजी मनपा सभागृहात झालेल्या झोननिहाय पाणीपुरवठा विशेष बैठकीत दिले. 

पाणीपुरवठ्यासंबंधी नगरसेवकांच्या तक्रारी व त्यांच्या व्यवस्थित निराकरणासाठी महापौर सौ. अंजली घोटेकर व आयुक्त्त श्री. संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ ते ४ या कालावधीत झोननिहाय बैठकी घेण्यात आल्या. तीनही झोनचे नगरसेवक, अधिकारी, पाणीपुरवठा कंत्राटदार याप्रसंगी उपस्थित होते. अनेक महत्वाचे निर्देश देतांना अनियमित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी उज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीसंदर्भात सदर निर्देश दिले. 

१९ मे रोजी मा. मंत्री (वित्त,नियोजन आणि वने) तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. यात चंद्रपूर महानगरपालिकेचा आढावा घेण्यात आला असता चंद्रपूर शहरातील भूगर्भातील पाणी पातळी अतिशय खालावल्यामुळे सार्वजनीक तसेच खाजगी विंधनविहीरी तथा इतर विहिरींची पाण्याची पातळी बऱ्याच ठिकाणी खाली गेल्याने नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्री यांनी निर्देश दिले होते त्यानुसार महापौर सौ. अंजली घोटेकर व आयुक्त्त श्री. संजय काकडे यांनी त्वरीत उपाययोजना करण्यास सुरवात केली होती. 

पाणीपुरवठ्यासाठी मा.महापौरांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर, स्थायी समिती सभापती, गटनेते, सहायक आयुक्त, झोन सभापती, अधिकारी वर्ग यांची नियोजन समिती गठीत करण्यात आली आहे. सहायक आयुक्तांनी झोननिहाय प्रत्यक्ष पाहणी करावी त्याचा रेकॉर्ड ठेवावा व संबंधित उपाययोजनांची रिपोर्टींग दरदिवशी मा. महापौर व मा. आयुक्तांकडे करावी तसेच ज्या ठिकाणी टँकर पोहचू शकत नाही त्याठिकाणी नागरिकांना कसे पाणी मिळेल याची उपाययोजना करावी. लिकेजेस, रिपेयर, बोरिंग ठीक करणाऱ्या टीमची संख्या वाढविण्याचे निर्देश महापौरांनी दिले. ज्या बोरिंग बंद आहेत त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करावी व ज्या बोरिंग पूर्णपणे कोरड्या झालेल्या आहेत त्यावर तसे लिहीण्याचे अथवा तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले. भविष्यकाळात उद्भवणाऱ्या पाणी समस्येसाठी गुंतवणूक व शाश्वत उपाययोजना म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टींग होय. याकरीता प्रोत्साहन म्हणून मनपातर्फे टॅक्समधे २ टक्के सूट व २५०० रुपये अनुदान देण्यात येते. परंतु नागरिक याबाबतीत अजूनही उदासीन आहेत. दरवर्षी वाढणारे तापमान व भूगर्भातील खालावत असलेली पाण्याची पातळी पाहता ही योजना राबविण्यासाठी अधिकाधिक जनजागृती करणे आवश्यक आहे. याकरीता विशेष माहिती शिबीर आयोजन करण्यात येईल. टिल्लू पम्प वापरणाऱ्या लोकांवर कारवाईसाठी कारवाई करणाऱ्या पथकांची संख्या वाढविण्याचे, लग्नसराईत पाण्याच्या टँकरची मागणी अधिक होत असते, मागणी झाल्यास त्यांना पाणीपुरवठा केवळ संध्याकाळी करण्याचे तसेच मनपाद्वारे उभारण्यात आलेल्या कृत्रिम टँक्स सकाळच्या सत्रात भरण्याचे निर्देश त्यांनी याप्रसंगी दिले. 

चंद्रपूर शहराची सद्यस्थितीत पाणीपुरवठा योजना ही १९९३ ची असून ९०,००० लोकसंख्येकरीता कार्यक्षम आहे. आजघडीला शहराची लोकसंख्या ४ लाखाच्या घरात आहे. शासनाने याकरीता अमृत योजने अंतर्गत काम सुरु असून ती कार्यान्वित होण्यास सध्या काही कालावधी अजून लागणार आहे. जगातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून दरवर्षी चंद्रपूर शहराची नोंद होते. उन्हाळ्यात पाण्याची उचल इतर शहरांपेक्षा ज्यास्त आहे. प्रत्येक घरी किमान २ तरी कूलर वापरात आहेत. याचा परीणाम पाणी पातळीवर होत असून पाण्याचा उपसा सातत्याने होत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावित आहे. शहरातील पाईपलाईनला खोदकामाद्वारे वारंवार क्षतीग्रस्त केले जात असल्यानेही पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो आहे. अश्या परिस्थितीत शहरात सर्व ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा करणे हे एक मोठे आव्हान आहेपाणीपुरवठा बाबतीत प्रशासन अतिशय गंभीरतेने काम करीत असून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करते आहे. याकरीता अधिकारी, कर्मचारी वर्गाच्या विविध टीम दिवसरात्र कार्यरत आहेत. पाणीपुरवठ्यासंबंधी प्रत्यक्ष पाहणीचे रिपोर्टींग अधिकाऱ्यांद्वारे मा. महापौर व मा. आयुक्तांना दररोज करण्यात येते. नागरिकांच्या व मनपा पदाधिकारांच्या मागणीनुसार नियमित टँकरद्वारे मागणीनुसार पुरवठा केला जात आहे. तसेच ५२ जागी पाण्याच्या सिंटेक्स टाक्या बसविण्यात आल्या आहेत. पालिकेच्या सातत्याने प्रयत्नानंतरही अनियमित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी उज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या २०११ ते २०१९ च्या कामाचे ऑडिट केले. यात कंत्राटाद्वाराद्वारे निष्काळजीपणा केल्याने शहरातील काही भागात पाणीपुरवठा अनियमित असल्याचे आढळून आले. यासंबंधी कंपनीला नोटीस दिली असता कुठलेही समाधानकारक उत्तर प्राप्त न झाल्याने कंत्राट रद्द करण्यासंबंधीचा प्रस्ताव मनपाच्या सर्वसाधारण सभेत मांडण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. 

या प्रसंगी मा. सभापती स्थायी समिती श्री. राहुल पावडे, उपायुक्त श्री गजानन बोकडे, झोन सभापती श्री. प्रशांत चौधरी, सौ. कल्पना बगुलकर, श्री. सुरेश पचारे, सहायक आयुक्त सौ. शीतल वाकडे, श्री धनंजय सरनाईक, श्री सचिन पाटील, शहर अभियंता श्री महेश बारई, श्री विजय बोरीकर, श्री जोगी व पाणी पुरवठा कंत्राटदार, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.