नागपूर/प्रतीनिधी:
डिसेंबर-२०२० पर्यंत राज्यातील १० लाख शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना सौर उर्जेमार्फत दिवसा वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केल्याची माहिती राज्याचे ऊर्जा, नवी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि. 5 जून) खापा येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमवेत संवाद साधतांना दिली.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजने अंतर्गत महावितरणच्या खापा येथील 33 केव्ही उपकेंद्रालगत उभारण्यात आलेल्या 900 केव्ही क्षमतेच्या सौर प्रकल्पाची पाहणी ऊर्जामंत्री यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसमवेत केली. खापा येथील या सौर ऊर्जा प्रकल्पातून तब्बल 800 शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा आणि शाश्वत वीज मिळणार आहे. केंद्र सरकारच्या नीती आयोगाने या प्रकल्पाचे भरभरून कौतुक केल्याची माहिती ऊर्जामंत्री यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांची दिवसा विजेची मागणी लक्षात घेता राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना आगामी काळात सौर उजेच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे वीजेची वितरण आणि वाणिज्य हानी कमी होण्यास मदत मिळेल. कृषीपंपांना सवलतीच्या दराने वीजपुरवठा करण्यात येत असल्याने उच्च दाब वीज ग्राहकांना क्रॉस सबसिडीमुळे वीज दरवाढीचासहन करावा लागणारा बोजा भविष्यात कमी होण्यास मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
या प्रकल्पातून मिळणारी वीज ही किफ़ायती असून पर्यावरणपुरक आहे, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात यासारखे अनेक प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहे. जलसंधारण कायद्यामुळे राज्यातील कृषीपंपांना 24 तास वीज पुरवठा करणे अशक्य असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. सौर ऊर्जा निर्मितीला शासनाने प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारल्याने आगामी काळात सौर ऊर्जेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार असून परिणामी सौर ऊर्जेचे दर मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा विश्व्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात या वर्षाअखेरीस 3500 मेगावॅट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. महावितरणच्या उपकेंद्रालगतच्या खाजगी जागेवर देखील महावितरण असा प्रकल्प उभारण्यास उत्सुक असून यासाठी शेतकरी आणि स्थानिक सरपंच यांनी पुढाकार घेऊन जमीन उपलब्ध करून देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल, मुख्य अभियंता (स्थापत्य) राकेश जनबंधू, नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता कुलदीप भस्मे, कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.