नागपूर/ललित लांजेवार:
राज्यात सरकारने आता वाहन खरेदी करतांना २ हेल्मेट अनिवार्य करण्याचे पत्र सर्व वाहन विक्रेत्यांना पाठवून दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे बजावले आहेत.
परीवहन आयुक्तांनी या संदर्भातील परिपत्रक काढले असून वाहन विक्रेत्यांनी दुचाकी विकताना सोबत दोन हेल्मेट देणे बंधनकारक केले आहे. अन्यथा वाहनाची आरटीओत नोंदच केली जाणार नसल्याचे निर्देश राज्य शासनाने राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.
उच्च न्यायालयाने २००३मध्ये दिलेल्या आदेशानुसार दुचाकी वाहनचालक व त्याच्या मागे बसून प्रवास करणारा अशा दोघांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य केले होते .विक्रेत्याने दोन हेल्मेट पुरविण्यात आले याबाबतचे पत्र जोडून वाहनाची नोंदणी करावी. याचे उल्लंघन झाल्यास केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १३८ च्या उपनियम ४ एफ प्रमाणे कार्यवाही करण्याची तंबीही दिलेली आहे. शिवाय दुचाकी वाहनांची नोंदणी केल्या जाणार नसल्याचे वाहन विक्रेत्यांना बजावले आहे.
दुचाकीस्वारांना होत असलेल्या अपघातात बहुतांशवेळी हेल्मेट नसल्यामुळे जीव जातो. दोन वाहनांची धडक झाल्यास डोक्याला मार लागण्याचे प्रमाण अधिक आहे. वाहन घसरून पडले तरी डोक्याला मार लागून जीव जात असल्याच्या घटना घडत आहे.
यावर नियंत्रण आणून जीव वाचविण्यासाठी प्रत्येक दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. वाहन विक्रेत्यांनी वाहन खरेदीदारास दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. अन्यथा वाहनाची नोंदच केली जाणार नाही, असे निर्देश आहेत.यासाठी जिल्ह्यात सर्व दुचाकी शोरूमला आम्ही पत्र पाठविले आहे या पत्राची अंमलबजावणी जरी शोरूम मालकांनी केली नाही तर वाहनांची नोंद देखील परिवहन कार्यालाय्त होणार नाही अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, विश्वांभर शिंदे, चंद्रपूर यांनी दिली आहे.
आधी चंद्रपुरात हेल्मेट नसल्यामुळे शहरात दोन महिलांचा मृत्यू झाला होता,त्या नंतर हेल्मेट सक्ती व्हायला पाहिजे अशी मागणी देखील काही सुजान नागरिकांकडून व्हायला लागली होती, यानंतर काही दिवस जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी हेल्मेट नसलेल्या वाहन चालकावर कारवाई करणे सुरू केले होते, मात्र थोड्याच दिवसात ही कारवाई थंड बस्त्यात गेली. आता पुन्हा एकदा राज्य सरकारने परिवहन विभागाला वाहन खरेदी करताना दोन हेल्मेट देण्याकरिता सांगितले असले तरी मात्र शहरात त्याची अंमलबजावणी होणार काय ? की या हेल्मेटचा वाहन चालक घरी लोणचे घालणार हे मात्र प्रशासनाच्या कारवाईनंतर समजणार आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड मिळेल |