होतकरू विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप
नागपूर/प्रतिनिधी:
ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त पुस्तकांचा संच आज मा.ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे शुभहस्ते लोणखैरी येथील युवा शक्ती वाचनालयाला सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम, कल्याण अधिकारी प्रसाद निकम, सहायक कल्याण अधिकारी अमरजित गोडबोले तर युवा शक्ती वाचनालयाचे अतुल आंजनकर,गुरू भोयर,अनिकेत आंजनकर,सुहास आंजनकर,समीर पुरी,अभिजित ठाकरे, प्राज्वल आंजनकर,गौरंग मानकर, साक्षय आंजनकर,पराग अंबाडकर, कोमल मोवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
युवा शक्ती वाचनालय लोणखैरी येथील तरुणांनी स्पर्धा परीक्षा पुस्तकांची मागणी नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे कडे केली होती व त्यानुसार त्यांनी शैक्षणिक बांधिलकी जोपासली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना दर्जेदार साहित्य व पुढील शिक्षणासाठी शहरात जावे लागते व त्याकरिता त्यांना आर्थिक भार सोसावा लागतो, अशा विद्यार्थ्याना आवश्यक साहित्य संपदा ग्रामीण भागातच उपलब्ध करून दिल्याने युवा शक्ती वाचनालयाच्या समस्त विद्यार्थ्यानी नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना विशेष धन्यवाद दिले आहेत.
महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्राच्या अधिकाऱयांनी या विधायक कामाकरिता पुढाकार घेऊन ह्या विद्यार्थ्याना आवश्यक असलेला स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच उपलब्ध करून दिला.
यामध्ये मराठी, गणित, इतिहास,भूगोल,राज्यशास्त्र,पंचायतराज,अर्थशास्त्र, विज्ञान,पर्यावरण,मराठी व्याकरण, इंग्रजी,बुद्धिमत्ता चाचणी, सामान्यज्ञान सारख्या उपयुक्त पुस्तकांमुळे रेल्वे, बँकिंग, महानिर्मिती, महावितरण व स्टाफ सिलेक्शन सारख्या परीक्षा देण्यास लोणखैरी गावातील सुमारे १०० ते १५० मुलामुलींना याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फार मोठा हातभार लागणार आहे.