संजय भाकरे फाउंडेशनच दरमहा एकांकिका उपक्रम
नागपूर- नवीन तरुणाई ची पिढी दिशाहीन झालेली आहे. नक्की कोणावर प्रेम करावे हे त्या भाबड्या मनाला कळेनासे झाले आहे. भावनेच्या भरात प्रेम करतो. दिशा चुकते आणि मग घेतलेल्या निर्णयावर पश्चाताप उरतो अश्या संदर्भाची कथा असलेली 39 वी एकांकिका लेखक विशाल कदम लिखित “ लव्ह फोरेव्हर ” संजय भाकरे फाउंडेशन च्या दरमहा एकांकिका चळवळीत नुकतीच रसिकांच्या भरगच्च गर्दीत गजानन नगर समाज भवन रंगमंच येथे नवोदित कलावंताच्या अभिनयाने साकार झाली.
तो (श्रीराम डोंगरे) उत्तम चित्रकार असतो. ती (हर्षदा देशपांडे) त्याच्या वर मनापासून प्रेम करते. इटलीला जावून मोनालिसा पेक्षा सुंदर चित्र प्रेयसीचे काढावं. एक सुंदर स्वप्न त्या दोघांचे असतं. मात्र एक दिवस ती “ मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही” पप्पांना हे लग्न मान्य नाही ”. तिचे मन वळविण्याच्या तो आटोकाट प्रयत्न करतो. त्यांनी सजवलेल्या सुखी संसाराची कोवळी स्वप्ने करपून जातात. अलीकडे हे फ्याड झाले आहे. प्रेम एकाशी लग्न दुसर्याशीच. त्या प्रॅक्टिकल असतात. मित्र ( सिद्धांत क्षीरसागर) त्याला समजवतो. तो ही प्रेमभंगी असतो. प्रेमभंगी ग्रुप चा अड्मिन असतो. माणसांशी खेळण्यापेक्षा शब्दांशी खेळणे कधीही चांगले. शेवटी प्रेमात एकत्र राहणे महत्वाचे नाही तर ती दोघे कुठेही असो त्यांच्यात प्रेम असणे महत्वाचे.
संजय भाकरे फाउंडेशन च्या या एकांकिकेत प्रथमच या कलावंतांनी कार्यशाळा अभ्यासून नाटकात भूमिका केली. परिपक्व वाटणारी ही नवीन कलावंत नागपूरच्या भविष्याची नांदी आहे. नाटकाचे दिग्दर्शन संकल्प पायाळ यांनी केले. नवीन मुलांना वाचिक अभिनयातील बारकावे करवून घेतांनी दिग्दर्शकाची मेहनत दिसत होती प्रकाश योजना बाल्या लारोकर, संगीत कनक खापर्डे, सुत्रधार ऐश्वर्या डोरले, यांची होती.
याच शृंखलेतील 40 वी एकांकिका यतीन माझिरे लिखित “ वीसाचे गणित” ही होती. धनश्री लोहकरे आणि आनंदी रहाटगावकर यांनी त्यात प्रमुख भूमिका साकारल्या. लहानश्या खेडेगावात वावरणार्या या दोन बालपणीच्या मैत्रिणीचे स्वभाव दर्शन यात उलगडण्यात आले. एक आई वडीलांच्या संस्कारात मोठी होऊन शिक्षिका होते तर दुसरी आई वडिलांच्या प्रेमाला पारखी असल्यामुळे गावातल्या उनाड मुलांसोबत राहून वेगळ्याच मार्गाला लागते. लहानपणीचे वीस अधिक वीस चाळीस होतात हे गणित उमजत नाही. दोन भिन्न विचारधारा एकत्र होऊ शकत नाही. मैत्री कायमची संपते. धनश्री आणि आनंदी यांनी भूमिकांना योग्य न्याय दिला. ही सर्व कलावंत पहिल्यांदा रंगमंच्यावर आली असून त्यांचा सहज सुंदर अभिनय लक्षात राहतो. संवादाचे पाठांतर, अचूक टायमिंग, यांनी आपआपल्या चेहर्यवारील हावभाव, रसिकांची दाद घेणारे होते. या नाटकाचे दिग्दर्शन संकेत महाजन यांनी केले. ऋषिकेश देशमुख, तेजस, समीर गोखले, सार्थक पांडे, डॉ.सागर देशपांडे, अमीषा यादव , पुजा गोळे यांनी सहकारी केले. निर्माती अनीता भाकरे होत्या. संजय भाकरे फाउंडेशन तर्फे नवोदित कलावंता साठी एक महिन्याची वाचिक अभिनय ते प्रयोग अशी कार्यशाळा घेण्यात आली॰ यातून ही प्रतिभावंत नाट्य कलावंत समोर आली. प्रारंभी अभिनेत्री रूपाली मोरे आणि पत्रकार ममता खांडेकर यांच्या हस्ते नटराज पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. नाटकाला फाऊंडेशनचा भरगच्च रसिकवर्ग हजर होता.