संगणकीयकृत सातबारा अद्ययावतीकरणाच्या
कामात अनेक चुकीचा नोंदी
रमेश माहूरपवार, मूल
शेतक-यांना संगणकीयक्रुत सातबारा देण्याच्या महसुल विभागाच्या प्रयत्नांमध्ये तलाठयांचे संगणकाबाबतचे अज्ञान अडसर ठरत आहे. सातबा-याचे संगणकीयक्रुत करण्यासाठी अनेक तलाठयांनी खाजगी व्यक्तीची नियुक्ती केली आहे. जुन्या सातबा-या वरून संगणकामध्ये नोंदी घेतांना मोठया प्रमाणात चुका झाल्या आहेत. मात्र तलाठयांनी केलेल्या चुकांचा त्रास शेतक-यांना सहन करावा लागत आहे.
सर्वच क्षेत्रात आधुनिकतेचे वारे वाहुत आहे. त्यात शासकीय यंत्रणा मागे राहणे शक्य नाही. महाराष्ट शासनाच्या महसुल विभागानेही सर्वच महसुल अभिलेखांचे संगणकामध्ये नोंदी घेण्याचे आणि शेतकरी,पक्षकार यांना संगणकीयक्रुत अभिलेख उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. शेतक-यांना संगणकीयक्रुत सातबारा देण्यासाठी येथील महसुल विभाग मागील दोन वर्षापासुन प्रयत्नरत आहे. परंतु महसुल मंडळातील अनेक तलाठयांना संगणकाचे ज्ञान नाही त्यामुळे ते अदयापही शंभर टक्के होउ शकले नाही.
महसुल अभिलेखांचे संगणकीयक्रुत अदयावतीकरण करणे शासनाच्या कार्यक्रम असल्याने तलाठी आणि मंडळ निरीक्षक यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले होते. परंतु प्रशिक्षण पुर्ण करूनही अज्ञीन राहीलेल्या तलाठयांनी संगणकाचे ज्ञान असलेल्या खाजगी व्यक्तीची स्वत:चा जबाबदारीवर नियुक्ती केली आहे. मात्र महसुली अभिलेखांचे संगणकात नोंदी घेतांना त्यांच्या त्यांच्याकडुन चुका होत आहे. सातबा-यांमधील नांव कमी होणे,मालकी हक्काची जमीन असतांना वाटपात मिळाल्याची नोंद असणे,भुमापन क्रमांक, भोगवटदारांचे नावात बदल अशा अनेक चुका संगणकीय सातबा-यात पहायला मिळतात. परंतु झालेल्या चुका मान्य न करता पक्षकाराला अपीलात जाण्याचा अजब सल्ला देण्यास तलाठी विसरत नाही. सातबा-यांमधील तलाठयांनी केलेल्या चुकांचे भुर्दंड शेतक-यांनाच सहन करावे लागत असल्याने याप्रणालीविषयी नाराजी व्यक्त केल्या जात आहे.
पक्षकारांच्या महसुली अभिलेखात कोणत्याही प्रकारची दुरूस्ती वा अदयावतीकरण केल्या जात असतांना त्याची माहिती संबधीत पक्षकाराला देणे आणि काही हरकती असल्यास त्या मागविणे गरजेचे आहे. सातबारांचे संगणकीय नोंद घेत असतांना सुचनापत्राव्दारे संबधीत शेतक-यांना माहिती देणे आवश्यक होते. मात्र येथील महसुल विभागाने हा नियम पायदळी तुडवित शेतक-यांच्या त्रासात भर घातली आहे.