नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणचा ग्राहक होतोय हायटेक
ऑनलाईन व्यवहाराप्रती वीज ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढत असून महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यात ऑनलाईन वीजबिल भरणा-या ग्राहकांचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे.
आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये तब्बल 54 लाख 13 हजार ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून 751 कोटी 53 कोटी रुपयांचा भरणा केला होता हा आकडा आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये मोठ्या प्रमाणात वाढला असून सुमारे 81 लाख 75 हजार व्यवहारांच्या माध्यमातून 1 हजार 194 कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला.
महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी संकेतस्थळाशिवाय, महावितरण मोबाईल ॲप, पेटीएम आणि इतरही ऑनलाईन सेवांच्या माध्यमातून वीजबिलांचा भरणा करण्यासाठी सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत, या सेवांची व्याप्ती आणि सहज वापर यामुळे ग्राहकांचा कल यांचेकडे सातत्याने वाढत आहे.
शहरी ग्राहकांसोबतच ग्रामिण भागातील वीज ग्राहकही या सेवांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे दिसून येत असून वीजबिल भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे न राहता अवघ्या काही मिनिटांत वीजबिलांचा भरणा करता येणे शक्य झाले आहे.
याशिवाय वीज बिलाचा एसएमएस येताच त्याच लिंकवरून वीजबिल भरण्याची सुविधा असल्याने वेळीच बिलांचा भरणा केल्यामुळे ग्राहकांना विलंब आकाराचा भुर्दंड ही भरावा लागत नाही याउपरांत अनेक ग्राहक वेळीच बील भरणा करून बिलाच्या रकमेत मिळणारी सवलतही मिळवित आहेत.
विदर्भातील अकराही जिल्ह्याचा विचार करता 2017-18 मध्ये नागपूर शहर मंडलात 7 लाख 57 हजार ऑनलाईन व्यवहारांतून ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरणा केला होता, हा आकडा 2017-18 मध्ये तब्बल 10 लाख 27 हजारावर गेला असून नागपूर ग्रामिण मंडलातील 7 लाख 57 हजाराच्या तुलनेत 2018-19 मध्ये 10 लाख 22 हजारावर गेला आहे.
याशिवाय वर्धा जिल्हातील 5 लाक 15 हजाराच्या तुलनेत 6 लाख 67 हजार ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा केला आहे. भंडारा जिल्ह्यातील 2 लाख 91 हजाराच्या तुलनेत 6 लाख 9 हजार, गोंदीया जिल्ह्यातील 3 लाख 46 हजाराच्या तुलनेत 6 लाख 20 हजार, चंद्रपूर जिल्ह्यातील 5 लाख 59 हजाराच्या तुलनेत 8 लाख 94 हजार तर गडचिरोली जिल्ह्यातील 2 लाख 53 हजाराच्या तुलनेत 4 लाख 69 हजार ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून ग्राहकांनी आपल्या वीज बिलांचा भरणा केला आहे.
याचसोबत आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये अमरावती जिल्ह्यातील 5 लाख 43 हजार व्य्वहार तर 2018-19 मध्ये 8 लाख 69 हजार ऑनलाईन व्यवहारातून तर यवतमाळ जिल्ह्यातील 4 लाख 10 हजार व्यवहाराच्या तुलनेत 6 लाख 10 हजार व्यवाहारातून ग्राहकांनी ऑनलाईन सेवांचा लाभ घेत वीजबिलांचा भरणा केला आहे.
अकोला जिल्ह्यातील 3 लाख 68 हजार व्यवहाराच्या तुलनेत 6 लाख 20 हजार व्यवहारातून याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातील 8 लाख 74 हजार व्यवहाराच्या तुलनेत 10 लाख 10 हजार व्यवहारातून तर वाशिम जिल्ह्यातील 2 लाख 2 हजार व्यवहारातून ग्राहकांनी 2017-18 मध्ये ऑनलाईन वीजबिल भरणा केला असतांना 2018-19 मध्ये हा आकडा 2 लाख 85 हजार व्यवहारांपर्यंत गेला आहे.
एकूणच ऑनलाईन वीजबिल भरणा करणा-या ग्राहकांची वाढती संख्या बघता महावितरणची ही सेवा दिवसेंदिवस अधिकाधिक लोकाभिमूख होत असल्याचे दिसून येत असून ग्राहकांनी या सेवांचा जास्तीतजास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.