चंद्रपूर/प्रतिनिधी:
या वसतिगृहाची जबाबदारी असलेल्या प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला
सेनेच्या चंद्रपूर शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर यांनी श्रमिक पत्रकार संघात पत्रपरिषदेत केली.
राजुरा येथील इन्फट जिजस शाळेतील वसतिगृहात पंधरा ते वीस अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून मुलींवरील अत्याचाराचा प्रकार सुरू असताना प्रकल्प कार्यालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब कशी आली नाही असा प्रश्न करीत या प्रकरणात त्यांचीही भूमिका संशयास्पद आहे. प्रत्येक महिन्याला मुलींची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असताना याकडे प्रकल्प कार्यालयाने दुर्लक्ष केले. वैद्यकीय तपासणी केली असती तर हा प्रकार वेळीच लक्षात आला असता आणि अनेक मुली अत्याचारापासून संरक्षित असत्या.
मात्र, प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संस्थेची पाठराखण केली. मुलींच्या बसतिगृह नियमाचे संस्थेकडून उल्लंघन होत असतानाही याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्प अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तीव्र आंदोलन करणार, असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या प्रतिमा ठाकूर यांनी दिला. पत्रपरिषदेला महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, भरत गुप्ता आदी उपस्थित होते.