Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १८, २०१९

धुलीवंदन आणि रंगपंचमी गैरप्रकार रोखण्यासाठी अभियान राबवणार !



हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांचे संयुक्त अभियान !

मानवी साखळीद्वारे ‘खडकवासला जलाशय रक्षण’



पुणे - हिंदु सण आणि उत्सवांत शिरलेले अपप्रकार दूर व्हावेत आणि योग्य धर्मपालन करता यावे, यासाठी हिंदु जनजागृती समिती विविध स्तरांवर कार्य करते. याअंतर्गत धुलीवंदन आणि रंगपंचमी या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवण्यात येणार आहे. हे अभियान गेली 16 वर्षे सातत्याने राबवण्यात येत असून प्रत्येकी वर्षी 100 टक्के यशस्वी होत आहे, हे याचे एक वैशिष्ट्य आहे. यंदाच्या वर्षी 21 मार्च (धुलीवंदन) आणि 25 मार्च (रंगपंचमी) या दोन्ही दिवशी हे अभियान राबवण्यात येणार आहे. अवघ्या पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा जलाशय हिंदु सणांच्या नावाखाली दूषित करणे, सर्वथा अयोग्य आहे. यासाठी आम्ही प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही जलाशयाच्या काठावर मानवी साखळी करून या जलाशयाचे रक्षण करणार आहोत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्रमिक पत्रकार संघामध्ये 18 मार्चला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव, रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर आदी उपस्थित होते.

श्री. गोखले पुढे म्हणाले की, रंग खेळून जलाशयात उतरणे, यात कोणतीही धार्मिकता नाही. हे धर्माच्या नावाखाली चाललेले गैरप्रकार आहेत. हे थांबवले पाहिजेत. राज्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असतांना अशाप्रकारे जलाशय प्रदूषित करणे अक्षम्य आहे. पुणे जिल्हाधिकारी, तहसिलदार, पाटबंधारे विभाग आणि पोलीस प्रशासन यांना या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. यावर ‘अभियानासाठी प्रशासन सर्वतोपरी साहाय्य करेल आणि अभियानस्थळी उपस्थित रहाण्याचा प्रयत्न करू’, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

या वेळी रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर म्हणाल्या की, काही वर्षांपूर्वी धुलीवंदन आणि रंगपंचमी या दोन्ही दिवशी रंगाने माखलेले युवक-युवती रंग खेळण्यासाठी, तसेच आंघोळीसाठी खडकवासला जलाशयात उतरत असत. परिणामी संपूर्ण जलाशयावर रासायनिक रंगाचा थर मोठ्या प्रमाणात पसरत असे. हेच पाणी पुणेकर जनता पिण्यासाठी वापरत असल्यामुळे त्यामुळे जनआरोग्य धोक्यात आले होते. हे लक्षात आल्यावर सामाजिक बांधिलकी आणि हिंदु सणांच्या नावाखाली चालणारे चुकीची कृत्ये रोखण्यासाठी हे अभियान आरंभण्यात आले. या अभियानात रणरागिणी शाखा, खडकवासला ग्रामस्थ, पाटबंधारे विभाग आणि अन्य समविचारी संघटना उत्स्फूर्तपणे सहभागी होतात आणि राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन अन् पर्यावरण रक्षण करतात. यामुळे या भागात घडणार्‍या गैरप्रकारांमध्येही लक्षणीय घट झाली आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव यांनी दिली. जलप्रदूषण रोखले जावे, उत्सवांमध्ये शिरलेले अपप्रकार थांबावेत आणि पोलीस-प्रशासन यांना सहकार्य व्हावे, या दृष्टीने समस्त जागरुक नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.



स्थळ : खडकवासला धरण परिसर

दिनांक : 21 मार्च (धुलीवंदन) आणि 25 मार्च (रंगपंचमी)

वेळ : सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत

अभियानात सहभागी होण्यासाठी संपर्क : 8983335517

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.