चंद्रपूर दि. 26 मार्च : 11 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या 8 उमेदवारांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज मंगळवारी नोटीस बजावली आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सुशील सेगोजी वासनिक, नामदेव माणिकराव शेडमाके, मधुकर विठ्ठल निस्ताने, अशोकराव तानबाजी घोडमारे, नामदेव केशव किनाके, विद्यासागर कालिदास कासर्लावार या सहा उमेदवारांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 वे निवडणूक खर्चाचे सनियंत्रण सुकर करण्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी एक दिवसाच्या आत स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक असते. बँकेचे खाते क्रमांक उमेदवार आपल्या नामनिर्देशन दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी कळवतील अशी तरतूद आहे. तथापि वर उल्लेखित 6 उमेदवारांनी आपल्या नामनिर्देशनपत्रासोबत निवडणूक खर्चासाठीचे स्वतंत्र बँक खाते तपशील लेखी स्वरुपात सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
याशिवाय दशरथ पांडुरंग मडावी, राजेंद्र श्रीरामजी महाडोळे या दोन उमेदवारांनी अनुक्रमे 20 व 22 मार्च 2019 रोजी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. मात्र 26 मार्च पर्यंत दैनंदिन निवडणूक खर्च निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अंतर्गत खर्च सनियंत्रण विभागात सादर केलेला नाही.
त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक खर्चासाठीचा स्वतंत्र बँक खात्याचा तपशील लेखी स्वरूपात व दैनंदिन निवडणूक खर्च तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी या संहितेचे पालन न केल्यामुळे त्यांना नोटीस देण्यात येत असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. जे उमेदवार खर्च विषयक लेखे विहित कालावधीत सादर करणार नाहीत. त्यांच्याविरुद्ध लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 व भारतीय दंड संहिता ( आयपीसी ) 860 मधील कलम 171 नुसार कार्यवाही करण्यात बाबतच्या सूचना बजावण्यात आल्या आहेत.


