चंद्रपूर : चार महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला. यानंतर चार महिने सुखाचा संसार सुरू असतानाच महिनाभरापूर्वी पती अचानक बेपत्ता झाला. सर्वत्र पतीचा शोध घेतला मात्र, महिनाभरानंतरही पतीचा शोध लागला नाही. पोलिसांनी शोध घेऊन पती परत मिळवून द्यावा, अशी मागणी पत्नीने चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रपरिषदेत केली आहे. दरम्यान, तिने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदनही दिले आहे. .
समीक्षा नामक तरुणीचे चार महिन्यापूर्वी बिनाज्या मोहनसिंग कुमारिया याच्यासोबत विवाह झाले. विवाह आंतरजातीय असला तरी सर्वसंमतीने झाल्याचे ती सांगते. गेल्या चार महिन्यांपासून ते दोघे नगिनाबाग परिसरात भाड्याची खोली करून राहत होती. पत्नी समीक्षा ही एका गिप्टसेंटरमध्ये कामाला आहे. तर पती बिनाज्या कुमारिया हा पेंटच्या शोरूममध्ये कामाला होता. ११ फेब्रुवारी रोजी बिनाज्या याने प्रकृती बरी नसल्याचे पत्नीला सांगितले. त्यामुळे समीक्षा हीच कामाला गेली तर बिनाज्या घरीच होता. रात्री कामावरून परतल्यानंतर समीक्षाला घरी तिचा पती दिसला नाही. त्यामुळे तिने तो काम करीत असलेल्या पेंटच्या शोरूममध्ये चौकशी केली. परंतु, बिनाज्या हा त्या दिवशी कामावरच आला नाही. प्रकृती बरी नसल्याने क्राइस्ट हॉस्पिटल येथे भरती असल्याचे त्यांने मालकाला सांगितल्याचे मालकाने समीक्षाला सांगितले. यानंतर समीक्षाने क्राइस्ट हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. पंरतु, ११ फेब्रुवारी रोजी बिनाज्या नामक कोणताही रुग्ण रुग्णालयात भरती झाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे समीक्षाने सासरी वर्धा जिल्ह्यातील सारंगीपूर येथे चौकशी केली. परंतु, सासरच्या मंडळीनी उडवाउडवीची उत्तरे देत तुझा पती आहे, तुच शोध घे असे म्हणून त्यांनी भ्रमणध्वनी बंद केला. यानंतर सासरच्या मंडळीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसून, बेपत्ती पतीचा शोध घेऊन पती मिळवून द्यावा, अशी मागणी समीक्षाने केली आहे. पतीच्या बेपत्ता होण्यात सासरच्या मंडळीचा हात असल्याच संशय तिने व्यक्त केला आहे. यावेळी पत्रपरिषदेला महिला दलित सेनेच्या करुणा येलचलवार, सारिका उराडे, राशी उराडे, प्रशांत रामटेके, नीतू ठाकूर उपस्थित होते.