नागपूर/प्रतिनिधी
आम्ही हिंदुत्ववादी आहोत, पण आमचे हिंदूत्व संकुचित नाही. ते सर्वसमावेशक आहे. २०१४ मध्ये विदर्भाची मॅच आपण १०-० ने जिंकलो. यावेळी सुद्धा असाच स्कोअर असला पाहिजे. येणारी निवडणूक देशाला वेगळ्या वळणावर नेणारी ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे भाजपा- शिवसेना महायुतीच्या पूर्व विदर्भाच्या नागपुरात मेळाव्यात बोलत होते. सिव्हिल लाइन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात शिवसेना नेते श्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी, प्रदेशाध्यक्ष श्री रावसाहेब दानवे, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही उपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले, निर्णय न घेणारे सरकार आपण पाहिले आणि आता सर्वात गतिमान सरकारही आपण पाहत आहोत. पूर्वी किती पैसे लोकांपर्यंत पोहोचायचे, हे राजीव गांधीजी यांनीच आपल्या सर्वांना सांगितले आहे. महाराष्ट्रात ५ लाख घरे झाली, आणखी ५ लाख घरे निर्माणाधीन आहेत. शेतकऱ्यांना विक्रमी मदत राज्यात आणि देशात मिळाली. पंतप्रधान पीकविमा योजना, शेतकरी सन्मान कल्याण निधी यातून शेतकऱ्यांचे कल्याण साधले जात आहे, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कामगारांना ३००० रुपये पेन्शन देण्याची योजना याच सरकारने जाहीर केली आणि अमलात आणली. शेवटचा शेतकरी लाभान्वित होत नाही, तोवर कर्जमाफीची योजना सुरूच राहील, हे आम्ही आधीच सांगितले आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रस्ते निर्मिती होत आहे. सिंचनाचा अनुशेष दूर करण्यात येत आहे. विदर्भ-मराठवाड्यात सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हा नवीन भारत आहे. काही लोक पुरावे मागतात, हे दुर्दैवी आहे. एकीकडे पुरावे मागायचे आणि दुसरीकडे अतिरेक्यांना ‘जी‘ लावायचे. साराच प्रकार दुर्दैवी आहे, मुख्यमंत्री म्हणाले.