Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ०९, २०१९

बारब्रिक कंपनीकडून कामगारांचे शोषण

कामगारांनी एच.आर.मॅनेजरच्या हटावची केली मागणी
कंपनीसमोर दिले धरणे
रामटेक तालुका प्रतिनिधी- 

मनसर ते गोंदिया या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून बारब्रिक कंपनी प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीकडे या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे.मनसर ते सालई खुर्द व सालई खुर्द ते पुढे गोंदिया पर्यंत अशा दोन भागात या रस्त्याचे काम सुरू आहे.यासाठी मोठ्या प्रमाणावर विविध मशीन्स व मनुष्यबळाचा वापर कंपनीकडून केला जात आहे. 

मनसर ते सालई खुर्द या रस्त्याच्या कामासाठी रामटेक नजीकच्या चिचाळा रस्त्यावर कंपनीने नियन्त्रण कार्यालय व कामगारांच्या राहुट्या उभारल्या आहेत.या ठिकाणी कंपनीने कामगारांना राहण्यासाठी व त्यांच्या दोन वेळ जेवणाची व्यवस्था केली आहे.मात्र कंपनीकडून कामगारांचे शोषण होत असून कामगारांना नीट दोन वेळेचे जेवणही दिले जात नसल्याचा आक्रोश कामगारांनी आज दिनांक 9 मार्च 2019 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास कंपनीसमोर व्यक्त केला. 

कंपनीचे या युनिटचे एच.आर. मॅनेजर सूर्यधर दुबे हे कामगारांशी अत्यंत तुसडेपणाने वागतात, त्यांच्या कुठल्याही समस्या ऐकून घेत नाहीत.जास्त बोलण्याचा प्रयत्न केला तर कॉलर पकडतात, प्रसंगी मारहाणही करतात कंपनीकडून दिवस-रात्र या कामगारांकडून काम करून घेतले जात आहे. कामावरून परतण्यासाठी उशीर झाला व मेस ची वेळ निघून गेली. तर कामगारांना जेवनही या ठिकाणी मिळत नाही.कुठला कामगार रात्री-बेरात्री आजारी पडला तर त्यासाठी येथे डॉक्टर ची व्यवस्था ही नाही.


रामटेकला जाण्यासाठी संबंधित अधिकारी कुठले वाहन उपलब्ध करून देत नाही. कामगारांना पगारही अतिशय त्रोटक दिला जातो. पगार देताना वीस दिवसांचा पगार हा नेहमीसाठी कंपनी आपल्याकडे ठेवून घेत असते. त्यानंतरचा पगार कामगारांना देण्यात येतो. कामगारांनी काम सोडून जाऊ नये यासाठी ही शक्कल लढवण्यात आल्याचा आरोप कामगारांनी यावेळी केला. काम करताना कुठल्या वाहनाची तोडफोड झाली तर यासाठी संबंधित मशीन ऑपरेटर ला जबाबदार धरून त्याची हकालपट्टी करण्यात येते व त्याला पगारही देण्यात येत नसल्याच्या घटना या ठिकाणी घडल्याचे यावेळी कामगारांनी सांगितले. 

याबाबत कंपनीचे युनिट मॅनेजर गौतम सिंग यांना विचारणा केली असता कामगारांचे हे सर्व आरोप चुकीचे असून कामगारांची अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.कामगारांना प्रत्येकी तीनशे रुपयात या ठिकाणी जेवण दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. रामटेकचे डॉक्टर राजेश पावडे हे कंपनीचे पॅनल डॉक्टर असून कामगारांची तब्येत बिघडल्यास कंपनीतून त्यांना पाठवण्यात येते व त्यांच्यावर उपचार करण्यात येतो. एचआर मॅनेजर सुर्यधर दुबे यांच्याबाबत कामगारांच्या तक्रारी असू शकतात.आपण त्याबाबत चौकशी करू व कारवाई करू असे आश्वासन त्यांनी यावेळी कामगारांना दिले.

दरम्यान या ठिकाणी कामगारांकडून कायदा-सुव्यवस्थेला धोका उत्पन्न होऊ नये म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सरकटे यांनी या कंपनी परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.कंपनीत कार्यरत सुमारे दोनशे ते अडीचशे कामगार कंपनी कार्यालयासमोर धरणे देऊन दुबे हटाव अशी मागणी करीत होते.

रोज तेच ते जेवण करून कंटाळलेल्या काही कामगारांनी आज मटणाचा बेत केला होता. यासाठी लागणारी सामुग्री त्यांनी बाजारातून विकत आणली होती.मात्र मेस मधून त्यांनी कांदे घेण्याचा प्रयत्न केला व ते कांदे एचआर मॅनेजर सुधिर दुबे यांनी हिसकावून घेतल्याने कामगार संतापले असे कळते

महत्त्वाचे असे की मनसर ते गोंदिया पर्यंत या कंपनीकडून रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून अनेक ठिकाणी जुन्या पुलांना मोठे करण्याचे कामही सुरू आहे. यासाठी ठिकठिकाणी वळण रस्ते (डायव्हर्जन)तयार करण्यात आले आहेत. यावर रस्त्यावर आवश्यक ते फलक व रिफ्लेक्टर लावण्यात आलेले नाहीत त्यामुळे अनेक अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. रस्त्याचे काम करताना शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या काही सुरक्षाविषयक गोष्टी करायला पाहिजे त्या कंपनीकडून केल्या जात नाहीत. रात्री-बेरात्री 24 तास या ठिकाणी कंपनीकडून काम केले जात आहे मात्र यासाठी आवश्यक ते सुरक्षेचे इंतजाम मात्र करण्यात आलेले नाहीत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.