Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च ०३, २०१९

१० मार्चपासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

चंद्रपूर शहरात ३६,६६७ बालकांचे करण्यात येणार लसीकरण
चंद्रपूर/प्रतिनिधी:
Image result for 2 bund zindagi ki
 राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे येत्या, १० मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात मनपा स्तरीय समन्वय समितीची बैठक उपायुक्त श्री. गजानन बोकडे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २० फेब्रुवारी रोजी मनपा स्थायी समिती सभागृहात पार पडली. तुकूम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १० मार्च रोजी सकाळी ८ वाजता लसीकरण मोहिमेचे उदघाटन होणार आहे. चंद्रपूर शहरातील ० ते ५ वर्षाच्या ३६६६७ बालकांचे सकाळी ८ ते दुपारी ५ दरम्यान लसीकरण करण्यात येणार आहे. 

पोलिओ रोगाचे निर्मूलन करण्याच्या हेतूने सन १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच नियमित लसीकरण, ए.एफ.पी. सर्वेक्षण व पोलिओ रुग्ण आढळल्यास नियोजनाबद्ध लसीकरणामुळे जानेवारी २०११ पासून भारतामधे एकही पोलिओ रुग्ण आढळून आला नाही. याकरिता जागतिक आरोग्य संघटना ( World Health Organization - South-East Asia Region ) यांच्याकडून poliomyelitis Eradication बाबतचे प्रमाणपत्र दिनांक २७ मार्च, २०१४ रोजी भारताला प्रदान करण्यात आले आहे. ( poliomyelitis Eradication - सतत 3 वर्षे देशात पोलिओचा एकही रुग्ण आढळून न आल्यास हे प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेद्वारे दिले जाते.)

परंतु संपूर्ण जगातून पोलिओ निर्मूलन होईपर्यंत हा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. सद्य परिस्थितीत जगात एकूण ३३ पोलिओचे रुग्ण आहेत, ज्यात पाकिस्तान येथे १२ व अफगाणिस्तान येथे २१ रुग्ण २०१८ ला आढळून आले आहेत. पाकिस्तान व अफगाणिस्तान भारताचे शेजारी देश असल्याकारणाने पोलिओ संसर्गीकरणाचा धोका भारताला अजूनही आहे त्यामुळे पोलिओ निर्मूलन मोहीम सतत राबविणे गरजेचे आहे. 

पोलिओ (बालपक्षाघात) म्हणजे विषाणूमुळे येणारा लुळेपणा. काही गरीब देशांत हा रोग टिकून आहे. सुधारलेल्या देशांमधून लसींमुळे आणि मुख्यतः राहणीमान सुधारल्याने तो नष्ट झाला आहे. पाच वर्षे वयापर्यंतच्या लस न दिलेल्या सर्व मुलांना- विशेषतः पावसाळयात याच्यापासून धोका असतो. हा आजार झालेली 80 टक्के मुले एक ते दोन वर्षे गटातील असतात. 

चंद्रपूर महापालिकेच्यावतीने ७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, या मोहिमेंतर्गत एकही बालक पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. या दिवशी चंद्रपूर महापालिका कार्यक्षेत्रात शाळा, समाज मंदिर, अंगणवाडी, दवाखाने, इत्यादी ठिकाणी शहरात विविध ठिकाणी १३२ तात्पुरती लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर दिनांक १२ मार्च ते १४ मार्च या कालावधीत घरोघरी भेटीद्वारे उर्वरित बालकांना पोलिओ लस पाजण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त प्रवासात असलेल्या बालकांना, स्थलांतरित होत असलेल्या बालकांना व निवासाची व्यवस्था नसलेल्या बालकांना पोलिओ लस मिळावी याकरिता १८ मोबाइल टीमची व्यवस्था करण्यात येणार आहे. बस स्थानक, रेल्वे स्टेशन, यात्रास्थळे या ठिकाणी सुद्धा ३२ ट्रांझिट टीमद्वारा लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानंतर घरोघरी जाऊन लस पाजण्याकरिता एकूण १८६ टीमची व्यवस्था करण्यात येणार आहे. ५ बूथ / टीमकरिता १ पर्यवेक्षक असे लसीकरणाच्या दिवशी २७ पर्यवेक्षक व घर भेटीसाठी ३६ पर्यवेक्षक असणार आहेत. चंद्रपूर शहरात ० ते ५ वर्षे वयोगटाच्या ३६,६६७ बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, आरोग्य सेविका, आशा वर्कर, जिल्हा सामान्य रुग्णालय नर्सिंग स्कूल विद्यार्थी, खाजगी नर्सिंग स्कूल विद्यार्थी, अंगणवाडी सेविका / मदतनीस व स्वयंसेवक असं एकूण ६७० कर्मचारी व स्वयंसेवक सादर मोहिमेत कार्यरत असणार आहेत. 

तसेच महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभणार आहे.या मोहिमेंतर्गत नागरिकांनी आपल्या बालकांना पल्स पोलिओचा डोज द्यावा असे आवाहन महापौर सौ. अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्यामार्फत करण्यात येत आहे. 

याप्रसंगी उपायुक्त श्री. गजानन बोकडे, सहायक आयुक्त सौ. शीतल वाकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉ नितीन कापसे , डॉ. फुलचंद मेश्राम, वैद्यकीय महाविद्यालयातर्फे रोटरी क्लबचे प्रतिनिधी, डब्ल्यू सी एल चे प्रतिनिधी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.